वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना रुग्णालयात सामावून घेण्याबद्दल आमदार आणि रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्यात वाद घडल्याने इचलकरंजीतील आयजीएम उपजिल्हा रुग्णालय बुधवारी पुन्हा एकदा वादात आले. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचा आदेश दिल्यानंतर हा वाद संपला. तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून या अधिकारी-कर्मचाऱ्यांना रितसर रुग्णालयात सामावून घेण्याचा प्रयत्न राहील, असे आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकारांना सांगितले.

मागील काही दिवसांपासून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयासंदर्भात सोशल मिडीयावरुन व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याची शहानिशा करुन माहिती घेण्यासाठी आवाडे यांनी बुधवारी अचानकपणे रुग्णालयात भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयात दाखल करोनाबाधित रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करतानाच रुग्णालयात मिळणार्‍या सुविधांबद्दल विचारपूस केली असता रुग्णांनी सेवांबद्दल समाधान व्यक्त करीत कसल्याही तक्रारी नसल्याचे सांगितले. यावेळी रुग्णालयात प्राथमिक अत्यावश्यक व्यवस्था करुन देण्याच्या सूचनाही आवाडे यांनी केल्या.

त्यानंतर आवाडे यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शेट्ये यांच्याशी चर्चा करताना कोविड रुग्णांवर उपचारासाठी वॉर्डमधील अनेक बेड रिकामे असताना नवीन येणार्‍या रुग्णांना बेड नसल्याचे सांगून पाठविले जात असल्याबद्दल जाब विचारला. त्याचबरोबर पूर्वीच्या आयजीएमकडील ४२ वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना रुजू करुन घ्यावे, असे सांगितले. परंतू डॉ. शेट्ये यांनी संबंधित ४२ जणांचा स्टाफ भरुन घेण्यास स्पष्टपणे नकार दर्शविल्याने संतापलेल्या आवाडे यांनी शेट्ये यांना धारेवर धरले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याशी संपर्क साधून शेट्ये यांना बदलण्याचीही मागणी आवाडे यांनी केली. त्यानंतर अवघ्या काही वेळातच मित्तल यांच्याकडून संबंधित ४२ जणांना सेवेत सामावून घेण्याचे लेखी आदेश रुग्णालयास प्राप्त झाले.

कर्मचाऱ्यांना मिळणार न्याय

इचलकरंजी नगरपरिषदेच्या मालकीची इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल (आयजीएम) चार वर्षापूर्वी शासन निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे. त्यावेळी आयजीएमकडील वैद्यकीय आणि इतर ७० कर्मचाऱ्यांचे समावेशन आरोग्य विभागाकडे करण्यात आले. परंतू, अद्यापही ४२ जणांचे समावेशन झालेले नाही. त्यामध्ये ३ वैद्यकीय अधिकारी, ३२ स्टाफ नर्स, २ फार्मासिस्ट, २ एक्स-रे टेक्निशियन, २ लॅब टेक्निशियन, १ फिजीओथेरिपिस्ट यांचा समावेश आहे. परिणामी मागील दीड वर्षांपासून ते कर्मचारी सेवेबाहेर आहेत.

सध्या इचलकरंजीसह संपूर्ण जिल्ह्यात करोनाने थैमान घातले असून कोविड विलगीकरण रुग्णालय झालेल्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात स्टाफ अपुरा पडत आहे. त्यामुळे त्या ४२ जणांनी अशा संकटसमयी आरोग्यसेवेत रुजू व्हावे या संदर्भात आवाडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा सुरु केला आहे. त्यामुळे हे ४२ जण इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सेवा देण्यास रुजू होतील, असे सांगितले.