इचलकरंजी येथील आमराई मळ्यातील सुमारे साडेपाच एकरातील उसाच्या फडाला सोमवारी आग लागली. या आगीत सुमारे साडेतीन ते चार लाखांचे नुकसान झाले. अग्निशामक दलाच्या सहा बंबांनी ही आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसात झालेली नव्हती.
आमराई मळा परिसरात सुभाष वाघमोरे, संजय वाघमोरे, राजू वाघमोरे, अशोक नांद्रे, अजित पवार व अप्पासाहेब नांद्रे यांची शेती आहे. एकूण साडेपाच एकरातील उसाला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आग लागली. कडक ऊन आणि पालापाचोळा यामुळे बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला कळवताच जवानांनी तातडीने बंबासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासह या भागातील शिवसेनेचे उपशहरप्रमुख राजू आलासे, नवजीवन युवक मंडळाचे कार्यकत्रे व नागरिकांनीही धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, या आगीची माहिती मिळाल्यानंतर विविध साखर कारखान्यांच्या अधिका-यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते.