27 September 2020

News Flash

कोल्हापुरात पूरस्थिती

पाऊस, धरणातील विसर्गाने पंचगंगेला पूर

संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी धरणातील विसर्ग सुरू झाल्याने पंचगंगेचे पाणी  पात्राबाहेर पडत शहराच्या काही भागांमध्ये घुसले. या पूरस्थितीमुळे प्रशासनाने नदीकाठच्या लोकांचे स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गेले पाच दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरण भरल्याने शुक्रवारी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले. धरणातून सध्या ७,११२ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे काळम्मावाडी धरणातूनही शुक्रवारी विसर्ग सुरू केल्याने जिल्ह्य़ातील पंचगंगा, भोगावती, दूधगंगा, वेदगंगा नद्यांना पूर आले आहेत.

पंचगंगा नदी शुक्रवारी सायंकाळी धोका पातळीहून अधिक म्हणजे ४५ फुटावरून वाहात होती. यामुळे नदीलगतच्या करवीर तालुका आणि कोल्हापूर शहरातला पंचगंगेच्या पुराचा फटका बसला आहे. करवीर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पंचगंगेचे पाणी शिरले आहे, तर कोल्हापूर शहराला नदीच्या पाण्याने वेढा घातला आहे. नदीकाठच्या कुंभार गल्ली, सुतारवाडा तसेच बापट कॅम्प या नागरी भागातील अनेक घरे, इमारतींना पंचगंगेने आपल्या कवेत घेतले आहे. शुक्रवारी शहरातील पाऊस ओसरला असला तरी पश्चिम घाटात पडणारा पाऊस आणि धरणातील विसर्गामुळे ही पूरस्थिती लगेच ओसरण्याची शक्यता कमी आहे.

स्थलांतरास गती

‘राष्ट्रीय आपत्ती निवारण’ची ४ पथके जिल्ह्य़ात दाखल झाली असून बोटींच्या मदतीने  मदतकार्य सुरू केले आहे. आतापर्यंत कोल्हापूर शहरासह जिल्ह्य़ातील २३ गावांतील १८७८ कुटुंबातील ५५६१ लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या पुराचा सर्वाधिक फटका करवीर तालुक्यास बसला असून या एका तालुक्यातील १७०१ कुटुंबातील ४८६१ लोकांचे स्थलांतर केले आहे.

चंदगडमध्ये बोजवारा

चंदगड तालुक्यात  ताम्रपर्णी नदीला पूर आल्याने तेथील नागरिकांनी प्रांत कार्यालयाकडे ‘एनडीआरएफ’च्या पथकासह बोट मागितली होती. मात्र ही मदत उपलब्ध न झाल्याने स्थानिक तरुणांनी पुराच्या पाण्यात उतरत अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 12:29 am

Web Title: flood situation in kolhapur abn 97
Next Stories
1 कोल्हापूर जिल्ह्यातील धरणसाठा वाढला,राधानगरीतून 7112 तर अलमट्टीतून 150000 क्युसेक विसर्ग
2 कोल्हापूरात महापुराचा धोका; पावसाचा जोर पुन्हा वाढला
3 कापड खरेदीचे सौदे रद्द करण्याचा सपाटा
Just Now!
X