शेतक-यांनी पाण्याचे योग्य नियोजन व खोडवा ऊस पिकांचेही चांगले व्यवस्थापन याकडे लक्ष देऊन ठिबक सिंचनाच्या शेतीवर तसेच आडसालीपेक्षा सुरू व पूर्व हंगामी ऊस पिकावर भर देण्याचे आवाहन वारणा समूहाचे नेते व माजी मंत्री विनय कोरे यांनी केले.
तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याच्या वतीने शेतक-यांसाठी अवर्षणकाळातील ऊस पीक व्यवस्थापन, ऊस उत्पादनात वाढ, रोग व कीड नियंत्रण आणि ठिबक सिंचनाचे महत्त्व, या विषयावर ऊस पीक परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
कोरे म्हणाले, मनपाडळे परिसरात ठिबक सिंचनावर आधारित सहकारी पाणीपुरवठा व सामुदायिक शेतीचे मॉडेल वारणाकडून राबविणार आहे. वारणा कारखान्याचे तज्ज्ञ संचालक एन. एच. पाटील, वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटचे शास्त्रज्ञ डी. बी. फोंडे, बी. एच. पवार, एम. ए. फुके, विजय माळी यांनी मार्गदर्शन केले. ऊस विकास अधिकारी व्ही. एम. चव्हाण यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.