पंचगंगा नदी प्रदूषणप्रकरणी उच्च न्यायालयाने महापालिकेचे कान उपटल्यानंतर आता महापालिकेच्या यंत्रणेला जाग आली असून न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे सोमवारी घरगुती गौरी गणपती विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज केली आहे. महानगरपालिकेतर्फे पंचगंगा नदी घाट, रंकाळा तलाव, कोटीतीर्थ तलाव व अन्य काही ठिकाणी गणेश विसर्जन कुंड, काहीली व निर्माल्य कुंड इ. व्यवस्था करण्यात आली असल्याचे महापालिका प्रशासनाने रविवारी सांगितले.
पंचगंगा नदीच्या प्रदूषणात वाढ होऊ लागल्याने जनहित याचिका दाखल झाली आहे. त्याची दखल घेत उच्च न्यायालयाने कोणत्याही कारणास्तव नदीचे प्रदूषण होऊ नये अशा सक्त सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका यांच्यासह औद्योगिक वसाहतींना दिल्या आहेत. यामुळे महापालिका यंत्रणा खडबडून जागी झाली असून विसर्जनाची चोख व्यवस्था केली आहे. तसेच नदी प्रदूषण होऊ नये यासाठीही आवश्यक ती सोय उपलब्ध केली आहे.
दान केलेल्या गणेश मूर्ती महापालिकेच्या वतीने एकत्र करून इराणी खण व शेजारील खणीमध्ये विसर्जन करण्याची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. विसर्जनाठिकाणी दान केलेले निर्माल्य उठाव करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत नऊ पथके तयार करण्यात आली आहेत. पवडी विभागाचे २०० कर्मचारी, आरोग्य विभागाचे १०० व इतर विभागाचे कर्मचारी, ट्रॅक्टर-१००, डंपर-१० व जे.सी.बी.-०४ ची अशी यंत्रणा तनात करण्यात आली आहे. महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवानही विसर्जनस्थळी सुरक्षिततेसाठी साधनसामुग्रीसह तनात असणार आहेत. तसेच महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने विसर्जन ठिकाणांची साफसफाई करण्यात येणार आहे.