देशात यापूर्वी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी आणीबाणीसह अन्य तत्कालीन प्रश्नावर सरकारच्या विरोधात लढा उभारला. त्याच धर्तीवर आता देशात विद्यार्थ्यांनी धर्माध शक्तीच्या विरोधात लढा उभारला असता हा लढा मोडीत काढण्यासाठी संघ परिवाराच्या सरकारकडूनही विद्यार्थ्यांचे दमन होत असल्याचे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां तिस्ता सेटलवाड यांनी व्यक्त केले. नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर लावले गेलेले आरोप तद्दन चुकीचे आहेत, असा दावाही त्यांनी केला.
सोलापूर विद्यापीठ व हुतात्मा सेक्युलर फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सोलापूर विद्यापीठाच्या सभागृहात ‘भारतीय राज्य घटना व धर्मनिरपेक्ष लोकशाही’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा झाली. त्यावेळी तिस्ता सेटलवाड बोलत होत्या. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले. लातूरच्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीकांत गायकवाड हे उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी होते. उपमहापौर प्रवीण डोंगरे, पालिका स्थायी समितीचे सभापती पद्माकर काळे यांच्यासह कुमार शिराळकर, प्रा. एफ. एच. बेन्नूर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. संयोजक प्रा. एम. आर. कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
अ‍ॅड. सेटलवाड म्हणाल्या, सर्वच धर्मातील जातीयवादी व मूलतत्त्ववाद्यांच्या विरोधात लढावे लागणार असून त्यासाठी बौध्दिक पातळीवर उत्तरे-प्रत्युत्तरे देण्याची मानसिकता तयार करायला हवी. जातीयवादी व धर्माधवादाची आव्हाने लक्षात घेता त्याविरोधात धर्मनिरपेक्षतेचा विचार बुलंद करण्यासाठी देशातील सर्वच समविचार मंडळींनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. हैद्राबाद विद्यापीठात राहित येमुला या विद्यार्थ्यांने सरकारच्या प्रेरणेतून विद्यापीठाच्या प्रशासनाने केलेल्या छळामुळे आत्महत्या केली. त्याचा दाखला देत, यापूर्वीही या विद्यापीठात आठ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यावेळी संघ परिवाराची नव्हे तर काँग्रेसची सत्ता होती अशी टिप्पणी त्यांनी केली.
मुस्लिम धर्मातील महिलांना तीनवेळा तलाख उच्चारून घटस्फोट देण्याच्या प्रथेविरोधात उठाव झाला पाहिजे. तरच धर्मनिरपेक्ष विचारांना बळकटी मिळू शकेल, असेही त्यांनी नमूद केले.
डॉ. वाघमारे यांनी, ‘सेक्युलर’ शब्दाचा अर्थ केवळ धर्मनिरपेक्षता नव्हे तर जात, पंथ, वंश, लिंगनिरपेक्ष असा अभिप्रेत आहे. सध्या देशात असमानतेचे वातावरण निर्माण होत असताना त्याविरोधात लढण्यासाठी समतेच्या तत्त्वामुळे आधार असलेली धर्मनिरपेक्षता अधिक महत्त्वाची ठरते, असे विचार मांडले. सत्ताधाऱ्यांकडून एकीकडे राज्यघटना दिवस साजरा केला जातो, तर दुसऱ्या बाजूला याच सत्ताधाऱ्यांकडून घटनेच्या विरोधात देशात वातावरण तयार करून हिंदुराष्ट्राचा विचार जाणीवपूर्वक पेरला लात आहे. हा विरोधाभास लक्षात घेऊन सत्ताधाऱ्यांना उघडे पाडण्याची गरज असल्याचे डॉ. वाघमारे यांनी सांगितले. डॉ. श्रीकांत गायकवाड यांनीही विचारांची मांडणी केली. दुपारच्या सत्रात कुमार शिराळकर (राज्य घटना व समाजवाद) आणि प्रा. एफ. एच. बेन्नूर (भारतीय राज्य घटना व अल्पसंख्याक)यांनी सहभागी होऊन संवाद साधला.