16 October 2019

News Flash

अजित पवारांच्या कोल्हापूर दौऱ्यात नेते एकत्र, गटबाजी कायम

आगामी निवडणुकांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित सामोरे जाण्याचे ठरवले आहे.

अजित पवार

दयानंद लिपारे, कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यात काँग्रेस -राष्ट्रवादीच्या ऐक्याला गती आल्याचे पाहायला मिळाले. अंतर राहून असणारे उभय काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व खांद्याला खांदा लावून एकत्रित बसलेले दिसले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात भाजपशी संगत करणाऱ्या मंडळींशी पवार यांनी संवाद साधून आगामी निवडुकीवेळी ते पक्षाच्या धोरणाप्रमाणे वाटचाल करतील अशी पावले टाकली. राजकीय भाष्य न करता पवार यांनी बेरजेच्या राजकारणावर भर दिला असला तरी स्थानिक मतभेद मिटवण्यात त्यांना मर्यादा आल्याचे स्पष्ट झाल्याने गटबाजीचे लोण कायम राहण्याची चिन्हे आहेत.

आगामी निवडणुकांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित सामोरे जाण्याचे ठरवले आहे. मात्र, अद्याप सर्वच भागात दोन्ही काँग्रेसची नाळ मनापासून जुळली नसल्याचे दिसत आहे. कोल्हापूर महापालिका, गोकुळ, बाजार समिती येथील राजकारणात राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची जवळीक वाढली आहे. तशी सलगी अन्य भागात नाही. अजित पवार यांच्या दौऱ्यात पूर्वेकडील हातकणंगले- शिरोळ तालुक्यातील उभय काँग्रेसचे ऐक्य दिसले.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सलगीचे दर्शन

राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते मदन कारंडे यांच्या सहकारी संस्थेच्या कार्यक्रमात उभय काँग्रेसचे नेते मांडीला मांडी लावून बसले होते. कारंडे हे माजी खासदार निवेदिता माने गटाचे, पण नगरपालिकेच्या राजकारणात ते माने यांच्यापासून अंतर राखून राहिले. तर माजी आमदार अशोक जांभळे यांनी जवळीक कायम ठेवली.

या कार्यक्रमाला कारंडे यांनी प्रथमच काँग्रेसचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना निमंत्रित करून अध्यक्षस्थानही सोपवले. कारंडे यांच्या हा पहिलाच कार्यक्रम असा होता की त्याला माने उपस्थित नव्हत्या. त्यामुळे हा संदर्भ पकडून आमदार मुश्रीफ यांनी दोन्ही काँग्रेसची एकत्रित वाटचालीचे पुढचे पाऊ ल टाकणारा हा कार्यक्रम असल्याचे नमूद केले होते. खेरीज, अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम जिल्’ात यापुढे पाहायला मिळतील, असे त्यांनी मंगळवारी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

जांभळे – कारंडे वाद अनुत्तरित

जांभळे-कारंडे वादामुळे राष्ट्रवादीचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून देऊनही पवार यांनी त्यांच्यात ऐक्य सांधण्याच्या दृष्टीने भरीव काही केले नाही. उलट, जिल्हा परिषदेच्या राजकारणात खासदार राजू शेट्टी यांच्या ‘स्वाभिमाना’ची मदत  घेतल्याचे सांगून जांभळे – भाजपच्या इचलकरंजी नगरपालिकेतील राजकारणाला खतपाणी घातले. याचवेळी पवार यांनी जांभळे यांच्या घरी भेट देऊन ते निवेदिता माने यांच्यामुळे वेगळ्या मार्गाने जाणार नाहीत याची तजवीज केली. मात्र, या भेटीनंतर जांभळे यांनी निवडणुकीबाबत काय करायचे याचा निर्णय अद्याप झाला नसल्याचे सांगून ही भेट वैयक्तिक होती, असे स्पष्ट करत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली. यातून जांभळे – कारंडे वाद अनुत्तरित राहिला. शरद पवार यांनी अलीकडच्या भेटीवेळी निवेदिता माने यांना बेदखल केले होते, पण अजित पवार यांनी माने यांची नोंद घेतानाच पक्षाने त्यांच्यावर कसलाही अन्याय केला नसल्याचे सांगत त्याचे शिवसेना प्रवेशाचे राजकारण लखलाभ ठरोत, अशा शुभेच्या दिल्या.

First Published on December 20, 2018 12:15 am

Web Title: grouping in ncp party during ajit pawar kolhapur tour