राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना समकक्ष रिक्त पदांवर बिनशर्त समायोजन करावे, या मागणीसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनास देण्यात आले.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान मार्च महिन्यात संपुष्टात येणार आहे. या अभियानांतर्गत राज्यात एकूण १८ हजार अधिकारी व कर्मचारी आहेत. तर जिल्ह्यामध्ये १ हजार अधिकारी व कर्मचारी तर ३ हजार आशा स्वयंसेविका आहेत. नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच काम करूनसुद्धा ११ महिन्यांनी प्रतिनियुक्ती करावी लागते. विमा, फंड, अंशदायी पेन्शन योजना अशा सोयीसुविधा मिळत नाहीत, यामुळे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाच्या वतीने आंदोलन छेडले आहे.

३१ ऑगस्ट रोजी काळय़ा फिती लावून काम करण्यात आले होते. आंदोलनाचाच एक भाग म्हणून शुक्रवारी जिल्हाधिकारी, जिल्हापरिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात स्मिता खंदारे, नितीन लोहार, किरण खाडे, इंद्रजित पाटील, संदीप पाटील, दिलीप जाधव, युनूस शेख, महावीर खोत, अभिषेक वाळके, महादेव पाटील सहभागी झाले होते.