कोल्हापूर जिल्ह्य़ात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरू असून पंचगंगा नदी पात्राच्या बाहेर वाहत आहे.  गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्य़ात पावसाची संततधार सुरू असून आज सकाळी ७ वाजेपर्यंत राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी ३३ फूट ४ इंच इतकी असून पावसामुळे नद्यांवरील ३६ कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १०२ मि.मी. पावसाची नोंद   झाली असून, जिल्ह्यात काल दिवसभरात सरासरी ४२.४९ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. तालुकानिहाय पाऊस मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे- करवीर ४७.२७, कागल २८.६१, पन्हाळा ९३.००, शाहुवाडी ५४.००, हातकणंगले २१.७५, शिरोळ १७.४२, राधानगरी ४९.५०, गगनबावडा १०२.००, भुदरगड १४.६, गडिहग्लज ७.१४, आजरा ४२.२४ व चंदगड ३२.३३ अशी एकूण ५०९.८७ मि.मी. पावसाची नोंद झाली.

पाटंबधारे विभागाच्या आजच्या नोंदीप्रमाणे कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी ३३ फूट ४ इंच,  सुर्वे ३१ फूट ३ इंच, रुई ५९ फूट ६ इंच , इचलकरंजी ५६ फूट ४ इंच, तेरवाड ४९ फूट ९ इंच,  शिरोळ ४० फूट, नृसिंहवाडी ३५ फूट इतकी आहे.

पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे ७ बंधारे पाण्याखाली असून भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, खडक कोगे व सरकारी कोगे हे ४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तुळशी नदीवरील बीड हा १ बंधारा पाण्याखाली गेला आहे.  वारणा नदीवरील चिंचोली, तांदूळवाडी, कोंडोली, माणगांव, खोची व  शिगांव हे ६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कासारी नदीवरील कांटे, करंजपेन, पेडागळे, बाजार भोगाव, वालोली, पुनाळतिरपण, ठाणे आवळे व यवलूज हे ८ बंधारे, कुंभी नदीवरील कळे, शेनवडे, मांडूकले व वेतवडे हे ४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कडवी नदीवरील-पाटणे, सवते सावर्डे, शिरगांव व कोपाडे हे ४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धामणी नदीवरील सुळे हा १ बंधारा पाण्याखाली गेला आहे. वेदगंगा नदीवरील बस्वतडे हा १ बंधारा पाण्याखाली गेला आहे. जिल्ह्य़ात आज एकूण ३६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.