17 January 2021

News Flash

शेतीचा शून्य अनुभव, तरीही नवीन प्रयोग करण्याची जिद्द…महिन्याला ८० लाखांची उलाढाल करतायत IIT पदवीधर

कोल्हापूरच्या इचलकरंजीत दोन तरुणांच्या प्रयोगाला मिळतोय चांगला प्रतिसाद

पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा हा मुख्यत्वेकरुन उसाच्या उत्पादनासाठी ओळखला जातो. कोल्हापूर जिल्हा हा उसासाठी जसा प्रसिद्ध आहे तसाच तो गुळाचं उत्पादन, कोल्हापूरी चप्पल आणि पर्यटन स्थळांसाठीही नावाजलेला आहे. याच कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात IIT Bombay मधून इंजिनीअरिंगची पदवी घेतलेले दोन तरुण नवीन प्रयोग करुन लेटूस, मशरुम व अन्य भाजीपाल्याचं उत्पादन घेत आहेत. मयांक गुप्ता आणि ललित जवाहर हे दोन तरुण आपल्या या नवीन प्रयोगातून ४० विविध भाज्यांचं उत्पादन घेऊन महिन्याला ८० लाखांची उलाढाल करत आहेत.

ललित आणि मयांक यांनी IIT मध्ये इंजिनीअरिंग शिकत असताना मित्र झाले. मयांकने आपलं शिक्षण झाल्यानंतर झिलींगो नावाचं एक छोटसं स्टार्ट-अप सुरु केलं तर ललितने आपल्या फॅमिली बिजनेसमध्ये लक्ष घालायचं ठरवलं. २०१८ मध्ये मयांकने आपलं काम सोडून घरी परतणं पसंत केलं. “शेतीमध्ये काहीतरी नवीन प्रयोग करायचं माझ्या मनात होतं. सेंद्रीय भाजीपाला आणि इतर शेती उत्पादनासाठी e-commerce प्लॅटफॉर्म सुरु करण्याची माझी कल्पना मी ललितला बोलून दाखवली. मात्र थोडा अभ्यास केल्यावर हा प्रयत्न फारसा सफल होणार नाही असं आम्हाला लक्षात आलं.” मयांक बेटर इंडिया या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

नाशिकमध्ये महाराष्ट्रातला सर्वाधिक भाजीपाला उत्पादन केला जातो. परंतू महाराष्ट्रात exotic vegetables ची शेती फारशी केली जात नाही. या दिशेने आपलं पहिलं पाऊल टाकायचं ठरवल्यानंतर मयांक आणि ललित यांनी कोल्हापूरची निवड केली. कोल्हापूरमध्ये शेतीसाठी असणारं पाणी, मातीची गुणवत्ता, हवामान या सर्व गोष्टी पोषक आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबई, पुणे, बंगळुरु, गोवा यासारख्या ठिकाणी १२ तासांत पोहचता येतं. त्यामुळे उत्पादन हे ग्राहकापर्यंत फ्रेश पोहचवण्यात मदत होणार होती. त्यामुळे इचलकरंजी शहरात मयांक आणि ललित यांनी २०१९ साली लँडक्राफ्ट अॅग्रो नावाने एक छोटीशी फर्म चालू केली.

ललित आणि मयांक यांनी इचलकरंजी आणि नजिकच्या परिसरातील जवळपास १५० शेतकऱ्यांना पॉलिहाऊसच्या माध्यमातून exotic vegetables उत्पादन कसं घ्यायचं याचं प्रशिक्षण दिलं. २० एकरच्या जागेवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मयांक आणि ललित अनेक नवीन भाज्यांचं उत्पादन घ्यायला लागले. बघता बघता या प्रयोगाला बाजारात चांगला प्रतिसाद मिळायला लागला. हैदराबाद, चेन्नई, दिल्ली, महाराष्ट्रातील काही शहरांमधून मयांक आणि ललितच्या उत्पादनाला चांगली मागणी यायला लागली. या माध्यमातून एका वर्षभराच्या काळात दोघांनीही आपल्या नवीन स्टार्टअपचा टर्नओव्हर ८० लाखांपर्यंत नेला आहे. जाणून घ्या काय आहे या नवीन प्रयोगाची कल्पना…

आम्हा दोघांनाही शेतीचा काहीच अनुभव नव्हता. मी माझ्या आयुष्यात कधीही एक झाड लावलं नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला आम्ही खूप चुका केल्या. पण त्याच्यातून शिकत आम्ही इतपर्यंत पोहचलो, मयांकने बेटर इंडियाशी बोलताना माहिती दिली. लँडक्राफ्ट अॅग्रो या स्टार्टअपचा सहमालक ललित…तांत्रिक बाबी आणि उत्पादनाच्या मार्केटिंगकडे लक्ष देतो. “सेंद्रीय शेती करायला लागल्यानंतर त्यांच मार्केटिंग कसं करायचं हा आमच्यासमोर मोठा प्रश्न होता. साधारण ग्राहकाला आमची उत्पादनं कमी भावात बाजारात मिळायची. त्यामुळे आमच्या उत्पादनाचं काय वेगळं आहे, भाजी फ्रेश रहावी यासाठी आम्ही काय करतो हे पटवून द्यायला सुरुवातीला खूप वेळ जायचा. परंतू कोविडच्या काळात ताजं आणि सकस अन्न खाण्याकडे लोकांचा कल वाढला त्याचा आम्हाला फायदा झाल्याचं ललितने सांगितलं.

सध्या ललित आणि मयांक इचलकरंजीतील आणखी काही शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती आणि exotic vegetables चं उत्पादन कसं घ्यायचं याचं प्रशिक्षण देत आहेत. भविष्य काळात देशातील अन्य शहरांमध्येही या प्रयोग करण्याचा दोघांचा मानस आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2020 12:03 pm

Web Title: iit grads with zero farming experience earn rs 80 lakh month from exotic veggies psd 91
Next Stories
1 कोल्हापुरात नव्याने राजकीय गोळाबेरीज
2 पुण्यातल्या रानगव्यावरुन ट्रोल झाल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणतात…
3 “माझ्यावर टीका करणं हे मुश्रीफ-पाटील यांचं कामच झालंय”
Just Now!
X