सेंद्रिय शेतीला महत्त्व प्राप्त करून देण्याची भूमिका केंद्र शासनाने घेतली आहे. त्यासाठी उन्नत भारत अभियान शासनाने हाती घेतले असून ५९७ कोटी खर्चाची तरतूद केली आहे. या अंतर्गत पन्नास एकराचा एक क्लस्टर असे दहा हजार क्लस्टर बनविण्याची योजना आखली आहे. आत्तापर्यंत ९११८ क्लस्टर या देशात स्थापित झाले  आहेत. या कामासाठी सेंद्रिय शेतीमध्ये मौलिक योगदान दिलेल्या कणेरीच्या सिद्धगिरी मठाचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी मंगळवारी येथे केले .

या बरोबरच राष्ट्रीय गोकुळ मिशन द्वारे देशी गायींचा विकास करून गोकुळ ग्राम ही योजना देशभर राबविली जात असून  महाराष्ट्रातून तीन प्रस्ताव आले असल्याचेही त्यांनी सांगितले. देशी गायींचा विकास करून दूध क्षेत्रात क्रांती घडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

येथून जवळ असलेल्या कणेरी सिद्धगिरी मठ येथे आयोजित केलेल्या किसान समृद्धी प्रशिक्षण शिबिरात राधामोहन सिंह बोलत होते. कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत, कणेरीच्या सिद्धगिरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामी, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजयकाका पाटील, खासदार पुष्पेंद्र चंदेल, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, माजी मंत्री अण्णा डांगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. देशातील शेत जमिनीचे आरोग्य जोपासण्यासाठी देशातील सर्व शेतकऱ्यांना येत्या मार्चअखेर जमिनीच्या आरोग्य पत्रिका देण्याचा महत्त्वीकांक्षी कार्यक्रम केंद्र शासनाने हाती घेतला असून आतापर्यंत २ कोटी ५३ लाख माती नमुने घेतले असल्याची माहिती राधामोहन सिंह यांनी आत्तापर्यंत दीड लाखांहून अधिक माती नमुन्यांची तपासणी करून आरोग्य पत्रिका देण्यात आल्या असून उर्वरित शेतकऱ्यांना पुढील वर्षांत मार्चपर्यंत या पत्रिका निश्चितपणे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

धावता दौरा अन् मोदींचे अनुकरण

कणेरी मठामध्ये एक दिवस येऊन राहण्याची इच्छा व्यक्त करणारे   राधामोहन सिंह यांनी प्रत्यक्ष मठाला भेट दिली तेव्हा अक्षरश धावता  दौरा असेच स्वरूप ठेवले. संपूर्ण भाषणावर नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची छाप होती. काँग्रेसच्या साठ वर्षांतील चुकांचा पाढा वाचताना भाजपचे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कसे कार्यरत आहे, यावरच भर देत राहिले. देशातील शेतीच्या धोरणात्मक बाबीवर भाष्य अपेक्षित असताना निवडणुकीतील भाषण वाटावे असा त्यांचा वावर होता. मठाच्या लखपती शेती प्रकल्पाची त्यांनी केवळ बांधावरूनच पाहणी केल्याने संयोजकही निराश झाले. तर, पत्रकारांच्या एकाच प्रश्नाचे कसेबसे उत्तर देत त्यांनी पत्रकार परिषद गुंडाळली.