मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ अशोक चव्हाण कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर जिल्ह्य़ात एकेकाळी काँग्रेसचे पूर्ण वर्चस्व होते. पण अलीकडे जिल्ह्य़ात हा पक्ष पूर्णपणे निस्तेज झाला आहे, तरीही पक्षांतर्गत गटबाजी कमी होण्याचे नाव नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गेल्या आठवडय़ातील जिल्हा दौऱ्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे जिल्ह्य़ात येत आहेत.

कोल्हापूरची प्रतिमा ही काँग्रेसचा बालेकिल्ला अशी दीर्घकाळ राहिली. राजकीय पटलावर आणि राजकारणाला पूरक ठरणाऱ्या सहकारी संस्थांवर काँग्रेस पक्षाची मुद्रा कोरली गेली होती . लोकसभेच्या दोन्ही जागांसह विधानसभेच्या दहापकी बहुतांशी जागा जणू काँग्रेसकडे असायच्या. जिल्हा मध्यवर्ती बँक, गोकुळ दूध संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकरी संघ अशा सर्वच मोठय़ा सहकारी संस्था काँग्रेसच्या हाती असल्याने जिल्हाभर काँग्रेसचा रुबाब आणि दिमाखही दिसायचा. अलीकडे मात्र परिस्थिती पार बदलली आहे .

आता ’ गेले ते दिन गेले ’ असा विलाप करण्याची वेळ काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांवर  आली आहे. जिल्हाभर अजूनही परिस्थिती अनुकूल असताना त्याचा एकजिनसी लाभ उठवण्यात काँग्रेसचे स्थानिक नेते अपयशी ठरले आहेत. याला एकमात्र कारण ठरले आहे ते म्हणजे गटबाजी. पक्ष अस्ताला गेला तरी बेहत्तर पण मी, माझे घराणे आणि माझा गट या ‘मी’पणात काँग्रेसच्या अस्तित्वाला सुरुंग लागला तरी सावध होण्याची मानसिकता काँग्रेसच्या नेत्यांची  दिसत नाही.

सत्तास्थानांना सुरुंग

राष्ट्रवादीचा उदय झाला तरी कोल्हापूर गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसचा झेंडा फडकत राहिला. जयवंतराव आवळे व प्रकाश आवाडे असे दोन कॅबिनेट मंत्री एकाचवेळी मंत्रिमंडळात होते. नंतर काँग्रेसचे संख्याबळ निम्याने कमी झाले तरी सतेज पाटील हे राज्यमंत्री होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसला धक्का बसला. एकही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकू शकला नाही. नाही म्हणायला, विधान परिषद निवडणुकीत महादेवराव महाडिक यांना पराभूत करून सतेज पाटील यांनी पुन्हा आमदारकी मिळवली. सध्या काँग्रेसकडे असलेली ही एकच आमदारकी. जिल्हा मध्यवर्ती बँक , गोकुळ दूध संघ , कृषी उत्पन्न बाजार समिती , शेतकरी संघ यापकी कोणत्याही  सहकारी संस्थेवर काँग्रेसचा झेंडा फडकत नाही . पक्षातील गटबाजीचा परिणाम म्हणजे काँग्रेसच्या ताब्यात असणाऱ्या जिल्हा परिषदेवरही पाणी सोडावे लागले. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे सुपुत्र राहुल यांना काँग्रेसने उमेदवारी दिली पण त्यास विरोध दर्शवत प्रकाश आवाडे यांनी विरोधकांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली. त्यांनी राजू शेट्टी यांच्यासह भाजपाला पाठबा दिल्याने जिल्हा परिषदेत कमळ उगवले आणि अखेरचा सत्तेचा गडही काँग्रेसला गमवावा लागला.

जिल्हाध्यक्षपदाचा तिढा

कॉंग्रेसच्या नव्या जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांची निवड हा काँग्रेसच्या नेत्याच्या दृष्टीने सर्वाधिक प्राधान्यक्रमाचा विषय. गटबाजीचे लोण याच मुद्यावरून विस्तारत गेले. पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार पी. एन. पाटील यांची निवड १९९ मध्ये झाली होती.  त्यांच्या कार्यकाळात काँग्रेसची भरभराट होत राहिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आव्हानाला सामोरे जात काँग्रेस पक्षाचे ठळक अस्तित्व त्यांनी निर्माण केले. पण, अलीकडच्या काळात फोफावलेल्या गटबाजीचा काँग्रेसचे अस्तिव पार हरवले आहे . त्याला प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष निवडीची किनार आहे. १८ वष्रे सलगपणे पाटील हे अध्यक्षपद भूषवत आहे .  अध्यक्ष निवडीवरून पाटील आणि माजी खासदार कल्लापाण्णा आवाडे यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांत काँग्रेस भवनात बेदम मारहाण झाली होती. गेले काही महिने आवाडे यांचे सुपुत्र प्रकाश आवाडे यांनी अध्यक्षपद मिळावे यासाठी जोरदार प्रयत्न चालवले होते. मार्च महिन्यात नव्या अध्यक्ष निवडीचा बार उडायचा होता, तेव्हा मुंबईत  अशोक चव्हाण यांनी यासंदर्भातील नेत्यांची मते आजमावून घेतली. विधान परिषद निवडणुकीत सतेज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत प्रकाश आवाडे यांनीही उमेदवारी मागितली होती. त्यांना जिल्हाध्यक्षपद देण्याचा शब्द देऊन या रिंगणातून माघार घ्यायला भाग पाडले होते. त्याचा आधार घेत प्रकाश आवाडे यांचे नाव जिल्हाध्यक्षपदासाठी आघाडीवर असल्याचा दावा त्यांच्या गटाने केला. लगोलग त्यातील हवा काढून घेण्याचे काम विरोधी गटाने केला. सध्या आवाडे काँग्रेस पक्षावर नाराज आहेत. उद्या प्रदेशाध्यक्ष जिल्हा काँग्रेसमधील वादावर आणि जिल्हाध्यक्षपदावर कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष आहे.