कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी आंदोलन करण्याचा इरादा हद्दवाढ कृती समितीने व्यक्त केला असताना रविवारी झालेल्या हद्दवाढ विरोधी कृती समितीने मुख्यमंत्र्यांनी सूचित केलेल्या विकास प्राधिकरणाचा प्रस्ताव स्वीकारण्यासाठी अभ्यास समितीच्या अहवाला आधारे निर्णय घेण्याचे ठरवले. या समितीमध्ये चार निवृत्त सनदी अधिकारी, नाथाजी पोवार व अन्य दोन सदस्य यांचा समावेश असणार आहे.

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बठक झाली असता हद्दवाढीचा मुद्दा बारगळला. मुख्यमंत्र्यांनी विकास प्राधिकरण स्थापन करण्याबाबत हद्दवाढ समर्थक व विरोधकांनी निर्णय घ्यावा, असे सुचित केले. त्यानंतर गेली चार-पाच दिवस शहर व ग्रामीण भागामध्ये विचारमंथन सुरू झाले आहे. हद्दवाढ कृती समितीच्या बठकीमध्ये हद्दवाढ मुख्ममंत्र्यांनी जाहीर केली नसल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त करतानाच प्राधिकरण स्वीकारण्याऐवजी आंदोलन सुरू करावे. महापालिकेतील भाजप-ताराराणी नगरसेवकांसह भाजप पक्षाचे अध्यक्ष व नेत्यांनी प्राधिकरणाचे समर्थन करीत पाठिंबा व्यक्त केला. यामुळे कृती समितीच्या बठकीत मतभेद निर्माण झाले. अखेर प्राधिकरणाचा पूर्ण अभ्यास, शहराचा विकास व फायदा याबाबत खात्री झाल्याशिवाय प्राधिकरणाचा प्रस्ताव स्वीकारायचा नाही, असा निर्णय घेण्यात आला. आमदार राजेश क्षीरसागर, निमंत्रक आर. के. पोवार, भाजपचे शहराध्यक्ष संदीप देसाई, अजित ठाणेकर, अशोक जाधव, भूपाल शेटे, गणी आजरेकर, संपत चव्हाण, अमल माने, पंडितराव सडोलीकर, सतीशचंद्र कांबळे यांची भाषणे झाली. प्रविण केसरकर यांनी शहराशी संबंधित आमदार सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक व संभाजीराजे यांनी हद्दवाढीबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.

दरम्यान रविवारी हद्दवाढ विरोधी कृती समितीची बठक होऊन विकास प्राधिकरण म्हणजे नेमके काय आहे, याविषयी ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये साशंकता असल्याने चार निवृत्त सनदी अधिकारी व समितीतील काही सदस्य यांनी ग्रामीण भागातील लोकांशी संवाद साधण्याचा निर्णय घेण्यात आला.

ग्रामीण भागातील अडचणी कशाप्रकारे सोडवाव्यात याविषयीच्या ग्रामस्थांच्या सूचनांचे अवलोकन केले जाणार आहे.

यानंतर हे पथक राज्यात जिथे प्राधिकरण अस्तित्वात आहे तेथे तसेच तेथील ग्रामपंचायतींना भेटी देऊन प्राधिकरणामुळे नेमके काय साध्य झाले, हे समजून घेणार आहे. याचा समग्र अभ्यास केल्यानंतर प्राधिकरण स्वीकारण्याबाबतचे अंतिम मत निश्चित केले जाणार, असे नाथाजी पोवार यांनी सांगितले. यावेळी आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, माजी आमदार संपतराव पवार, राजू माने, बाबा देसाई यांची भाषणे झाली. ए.बी. पाटील-वाशीकर यांनी आभार मानले.