धुक्याच्या मंद पदरामध्ये लपेटलेला पंचगंगा नदीचा ऐतिहासिक घाट बुधवारी पहाटे सहस्र पणत्यांच्या उजेडाने उजळून निघाला. निमित्त होते त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमाचे. या उपक्रमामुळे पंचगंगेच्या सौंदर्याला चांगलाच साज चढला. पंचगंगेच्या अद्भुत नयनरम्य सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी करवीरकरांनी भल्या पहाटे पंचगंगेवर मोठय़ा प्रमाणात उपस्थिती दर्शवली. पंचगंगेसह रंकाळा, अंबाबाई मंदिर, कात्यायनी मंदिर, पतौडी घाटासह अनेक ठिकाणी विविध मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला.
गेली दोन दशके पंचगंगा फ्रेन्ड सर्कलच्या वतीने पंचगंगा घाटावर दीपोत्सव साजरा केला जात असून दीपोत्सव हा लोकोत्सव होऊ लागला आहे. सर्कलच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून परिसरात पणत्या मांडल्या होत्या. जुना बुधवार, शुक्रवार पेठ व उत्तरेश्वर पेठ येथील कार्यकर्त्यांनी युवक-युवतींच्या मदतीने पंचगंगा परिसरात सुरेख रांगोळ्या रेखाटल्या. पहाटे तीन वाजल्यापासून नदीकाठ भाविकांनी गजबजून गेला. त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून अभ्यंग स्नानाची पर्वणीही भाविकांनी साधली. पहाटे ४ वाजता दीपोत्सवला प्रारंभ झाला. एक एक पणती प्रज्वलित होवू लागली आणि बघता बघता हजारो पणत्या क्षणार्धात उजळून निघाल्या. ब्राह्मण घाट, परीट घाट आणि मधला घाट समाधिस्थळ यांना सौंदर्य प्राप्त झाले. पाण्यातील मंदिरे, ब्रह्मपुरी पिकनीक पॉईंट, शिवाजी पुलावरील दृश्य विलोभनीय होते. हनुमान मंदिराजवळ प्रशस्त घाटावर यावर्षी आडवी दोरी बांधल्याने दीपोत्सव नागरिकांना पाहता आला. विविध मंडळांच्या वतीने भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. दीपोत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती.
घाटावरील मंदिरांची शिखरे विद्य़ुत रोषणाईमुळे उजळून गेली होती. यावेळी सर्कल ग्रुपतर्फे फुटबॉल खेळाचे रंगावली, थर्मोकोलच्या साहाय्याने श्री महालक्ष्मी मंदिराची रेखीव प्रतिकृती, युथ फ्रेन्ड सर्कलने शिवराज्याभिषेक सोहळा- दर्शन मावळ्यांच्या मातीच्या पुतळ्य़ांमधून घडवले. शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे विदारक सत्य रांगोळीतून मांडण्यात आले. डॉल्बीद्वारा आळवलेला भूपाळीचा सूर त्या पहाटेच्या प्रकाशमय वातावरणात फारसा मंत्रमुग्ध करणारा नव्हता. तर शेजारीच असलेल्या ब्रह्मपुरीतील दग्र्यामध्येही दीपोत्सव केल्याने त्याला सौंदर्याचा साज चढून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शनही घडले.