News Flash

प्राप्तीकर छाप्यांचा मुश्रीफ यांना फायदा?

कोल्हापूर जिल्ह्य़ाचा राष्ट्रवादीचा चेहरा मुश्रीफ हेच आहेत.

निवडणूक प्रचाराचा प्रमुख मुद्दा

दयानंद लिपारे, कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील वजनदार नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी, मुलाच्या निवासस्थानी आणि दोन साखर कारखान्यांवर प्राप्तिकर विभागाने सलग दोन दिवस छापेमारी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुश्रीफ यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मात्र, या कारवाईला राजकीय वळण लागले आहे. या कारवाईत मुश्रीफ निश्चितपणे अडकतील, असा दावा विरोधकांचा आहे, तर यातून काहीच हाती लागले नाही तर मुश्रीफ हिरो ठरतील असे समर्थक सांगत आहेत. शासकीय कारवाईचे राजकीय नाटय़ जिल्ह्य़ाच्या विधानसभा निवडणुकीवर परिणाम करण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्य़ात १० पैकी एकही मतदारसंघात काँग्रेसचा आमदार निवडून आला नाही. राष्ट्रवादीचे दोन आमदार असून हसन मुश्रीफ व संध्यादेवी कुपेकर यांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ाचा राष्ट्रवादीचा चेहरा मुश्रीफ हेच आहेत. त्यामुळे त्यांनाच गळाला लावण्याची चाल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या आठवडय़ात खेळली. त्यांनी जाहीर कार्यक्रमात आमदार मुश्रीफ यांच्या कार्याचा गौरव करीत थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याचे आवाहन केले होते. तथापि, मुश्रीफ यांनी शरद पवार यांच्या कृपालोभाचा उल्लेख करीत राष्ट्रवादीतच राहण्याची भूमिका घेतली. याविषयावरून उठलेली चर्चा थांबते न थांबते तोच प्राप्तिकर विभागाने मुश्रीफ यांच्यावर केलेल्या कारवाईच्या चर्चेला तोंड फुटले. राजकीय आरोप-प्रत्यारोप याची राळ उठली आहे. भाजपमध्ये जाण्यास नकार दिल्याच्या रागातून सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्याने प्राप्तिकर विभागाने मुश्रीफ यांच्यावर छापे घातल्याचा मुद्दा राष्ट्रवादीकडून जोरकसपणे मांडला जात आहे.

गल्लीत राजकारणाचे समीकरण जुळत नाही म्हणून दिल्लीतून मुश्रीफ यांची राजकीय, आर्थिक कोंडी करण्याचा खटाटोप सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे करत आहेत.

मुश्रीफ यांची प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न

विरोधकांची कोंडी करण्यासाठी शासन यंत्रणेचा खुलेआम वापर सत्ताधारी भाजप करीत आहे, असा आरोप विरोधकांनी सातत्याने केला आहे. याचाच एक भाग म्हणून मुश्रीफ यांच्यावर प्राप्तिकर विभागाने  छापे टाकल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे. अशा प्रकारच्या कारवाईने प्रतिमा हनन होण्याबरोबरच त्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो असा आजवरचा अनुभव आहे. मुश्रीफ यांच्या बाबतीत उलटे घडत आहे. खरे तर, प्राप्तिकर विभागाची कारवाई रीतसर कामाचा भाग आहे. पण तो सुरू असताना मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी राष्ट्रवादीने घडवलेले राजकीय नाटय़ लक्षवेधी ठरले. शेकडो लोक, बायाबापडय़ांनी गर्दी करीत, अश्रू ढाळत मुश्रीफ यांच्यावर कारवाई झाली तर जीवाचे बरे-वाईट करून घेऊ, असा भावनात्मक इशारा दिला होता. तमिळनाडूसारख्या राज्यात बडय़ा नेत्यांच्या बाबतीत काही वाईट घडले की त्यांचे समर्थक, अनुयायी जे  करतात तसाच काहीसा प्रकार कागलमध्ये दिवसभर सुरू होता.  मुश्रीफ एकीकडे अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत असताना दुसरीकडे नागरिकांच्या पत्रांवर सह्य़ा करीत होते. त्यांच्या लेखी ही एक सामान्य, जुजबी कारवाई होती. त्यांच्या देहबोलीत सहजता होती, छापा पडला म्हणून अवघडून जाणे नव्हते. याच वेळी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते मुश्रीफ यांच्यावर भाजप राजकीय सूड घेत आहे, असा आरोपवजा प्रचार करीत होते. मुश्रीफ यांची प्रतिमा जपण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ‘भाजप मुश्रीफ यांना खलनायक ठरवत होता, पण ते नायक ठरले आहेत’, असा मजकूर  समाज माध्यमांतून पसरवला गेला. असे असले तरी प्राप्तिकर विभाग दोन दिवस ज्या पद्धतीने कारवाई करीत आहे, ते पाहता तपशील उजेडात येईल तेव्हा मुश्रीफ यांचा चेहरा कोणता  आणि मुखवटा कोणता ते स्पष्ट होईल, असे काही सूत्रांचे म्हणने आहे.

राष्ट्रवादी विरुद्ध भाजप सामना

मुश्रीफ यांच्यावरील कारवाई राजकीय आकसातून केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांच्यासह स्थानिक नेत्यांनीही केला आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची विनंती फेटाळल्याने सूडबुद्धीने सरकार आणि राज्यकर्ते वागत आहेत, अशी टीका केली जात आहे. याउलट, भाजपचे सरचिटणीस, आमदार सुरेश हाळवणकर यांनी प्राप्तिकर विभाग त्यांच्या शिरस्त्याप्रमाणे कारवाई करीत असताना त्याचा संबंध भाजप, सरकार, चंद्रकांत पाटील यांच्याशी जोडणे चुकीचे असल्याचा टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांनी याविषयी शुR वारी पत्रकारांशी बोलणे टाळले. यामुळे प्राप्तिकर विभागाच्या कारवाईवरून दोन्ही बाजूने तापवले जाणारे वातावरण पाहता कोल्हापूर जिल्ह्य़ात हा विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचाही प्रमुख मुद्दा बनण्याकडे वाटचाल सुरू झाली असल्याचे दिसू लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 5:01 am

Web Title: mla hasan mushrif benefits from income tax raids zws 70
Next Stories
1 कोल्हापूर जिल्ह्य़ात पावसाचे दमदार आगमन
2 हसन मुश्रीफ यांच्याविरुद्धची कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरू
3 मुश्रीफ यांच्यावरील कारवाईने कोल्हापूरचे राजकारण शिगेला
Just Now!
X