25 February 2021

News Flash

सारेच नेते साखरसम्राट!

सर्वाधिक पाच साखर कारखाने कागल तालुक्यात

(संग्रहित छायाचित्र)

दयानंद लिपारे

सर्वाधिक साखर कारखाने असलेला कागल तालुका अशी नवी ओळख या तालुक्याला मिळाली आहे. तालुक्यातील चारही प्रमुख नेत्यांचे साखर कारखाने सुरू झाले असून ही आणखी एक वैशिष्टय़पूर्ण बाब ठरली आहे. साखर कारखानदारीच्या माध्यमातून ऊस उत्पादकांना न्याय देण्याची भूमिका करताना या निमित्ताने या नेत्यांना राजकीय साखरपेरणी करणेही सोपी जाणार आहे.

काही दशकापूर्वी पाण्याची कमतरता असलेला कागल तालुका होता. दूधगंगा -वेदगंगा या दोन नद्या असल्या तरी त्यामध्ये पावसाळा सोडला की पुरेसे पाणी नसायचे. खरिपावर अवलंबून असलेली शेती असे चित्र होते. मात्र काळम्मावाडी धरण झाल्यानंतर तालुक्याचा चेहरामोहरा बदलला. या तालुक्यात कालव्याद्वारे अनेक भागात पाणी पोहोचले. परिणामी शेती बहरली. उसाची मोठय़ा प्रमाणात उपलब्धता झाल्याने नेत्यांनाही साखर कारखाने उभारण्याचे स्वप्न खुणावू लागले. त्यातून कागल तालुक्यात  पाच साखर कारखाने आता सुरू झाले आहेत.

कागल तालुक्याला कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या राजकारणाचे विद्यापीठ असे संबोधले जाते. विशेषत: दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील राजकीय संघर्ष यांनी जिल्हा ढवळून गेला होता. पुढे पवार- मंडलिक, घाटगे- घाटगे अशा विविध राजकीय संघर्षांमुळे राजकीय वादळी संघर्षांचा केंद्रबिंदू ठरला. तालुक्यात राजकीय पायाभरणी भक्कम करायची असेल तर जिल्ह्य़ातील अन्य प्रमुख नेत्यांप्रमाणे साखर कारखानदारांना साखर कारखाना आपल्याकडे असला पाहिजे, हे सूत्र नेत्यांच्या मनात भरले.

नेत्यांना साखर उद्योगाची मोहिनी

त्यातून तालुक्यात सर्वप्रथम बिद्री साखर कारखाना सुरू झाला असला तरी त्यावर कागल पेक्षा राधानगरी – भुदरगड तालुक्यातील नेतृत्व अधिक प्रभावी ठरले. त्यानंतर विक्रमसिंह घाटगे यांनी कागलच्या माळावर राजर्षी छत्रपती शाहू साखर कारखाना उभारला. या कारखान्यांने साखर कारखानदारीतील आदर्श मापदंड या कारखान्याने निर्माण केले. आता भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी राजेंची उद्यम परंपरा पुढे चालू ठेवली आहे. माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी तालुक्यात हमीदवाडा येथे साखर कारखाना सुरु केला होता. सदाशिवराव मंडलिक हमीदवाडा असे नामकरण झालेल्या या साखर कारखान्याचे नेतृत्व सध्या शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक हे करीत आहेत. हसन मुश्रीफ यांना साखर कारखाना सुरू करण्यासाठी मोठय़ा राजकीय संघर्षांला तोंड द्यावे लागले. १५ किमीचे अंतराचा नियम आडवा येत असल्याने आणि कायदेशीर अडचणीनिशी सामना करावा लागला. सरतेशेवटी त्यांनी बेलेवाडी काळम्मा येथे सरसेनापती संताजी घोरपडे हा खासगी कारखाना सुरू केला. अल्पकाळात या कारखान्याने आर्थिक पातळीवर मिळवलेले यश लक्षवेधी ठरले आहे. मुश्रीफ यांच्या सोबतीने अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी कारखान्याची धुरा सांभाळलेली आहे. जिल्ह्य़ातील हे तिने प्रमुख नेते साखर कारखानदारीत पुढे असताना मागे उरले होते ते केवळ संजयसिंह घाटगे.

काँग्रेस, स्वाभिमानी, शेतकरी संघटना,अपक्ष, शिवसेना असा राजकीय प्रवास केलेले घाटगे यांनी एकदा आमदारकी भूषवली होत. गेल्या दोन निवडणुका त्यांनी शिवसेनेकडून लढवली असल्या तरी यश मिळाले नाही. त्यांनाही साखर कारखाना उभा करण्यात साठी संघर्ष करावा लागला. अखेर मोठय़ा मेहनतीने त्यांनी केनवडे येथे ‘अन्नपूर्णा शुगर’ची उभारणी केली असून शनिवारी त्याचा गळीत चाचणी हंगाम सुरू झाला आहे. कागल तालुक्यातील साखर कारखानदारी उभारणीचा प्रवास पाहता तालुक्यातील मंडलिक, मुश्रीफ, आणि  दोन्ही घाटगे अशा चारही नेते या उद्योगाच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक, कृषी क्षेत्राशी बांधले गेले आहेत. एकाच तालुक्यातील सर्व प्रमुख नेते साखर कारखानदारीत असण्याचा राज्यातील हा एकमेव प्रकार असावा. साखर कारखानदारीतील वाढती स्पर्धा आणि आर्थिक आव्हाने पाहता आगामी काळात या क्षेत्रात राजकीय क्षेत्राप्रमाणे कोणकोणते नेते बाजी मारणार हे मात्र लक्षवेधी ठरणार आहे.

हमीदवाडा मंडलिक, सर सेनापती घोरपडे आणि अन्नपूर्णा शुगर हे तीन साखर कारखाने उभे राहण्यासाठी माझ्या परीने मदत झाली याचा आनंद आहे. पाच साखर कारखाने झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही चांगला आधार मिळाला असून त्यांचे जीवनमान सुधारले आहे.

– हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2021 12:13 am

Web Title: most of the five sugar factories are in kagal taluka abn 97
Next Stories
1 कोल्हापुरात आंबा दाखल; ४ डझनाला ३० हजार दर
2 साखरेची मागणी घटल्याने कारखाने अर्थपेचात
3 करोनामुळे यंदा गुलाबजाम
Just Now!
X