शाहूवाडी तालुक्यातील वारणा मिनरल्स कंपनीच्या अवैध खनिज उत्खननाविरोधात सोमवारी शिवसेनेच्या वतीने येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात अनोखे आंदोलन करीत मंडळातील भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढले. या उत्खननास प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकाऱ्यांनी अर्थपूर्ण व्यवहार करून त्याकडे डोळेझाक केल्याने शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांच्या लक्ष्मीदर्शनाविरोधात कार्यालयातच लक्ष्मीपूजन केले. भटजींकरवी लक्ष्मीपूजा घालत शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीचा निषेध नोंदवला.
वारणा मिनरल्स कंपनीच्या अवैध खनिज उत्खननाविरोधात शिवसेनेने आंदोलनाची मालिका सुरू करणार असल्याचे गेल्या आठवडय़ात स्पष्ट केले होते. त्याचा पहिला टप्पा सोमवारी सुरू झाला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, चंद्रकांत भोसले यांच्यासह शिवसैनिकांनी उद्योग भवनात असलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात जाऊन अनोखे आंदोलन आरंभले. या खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष्मीदर्शन करून वारणा मिनरलच्या कारभारास हिरवा कंदील दर्शवल्याचा आरोप यापूर्वीच शिवसेनेने केला होता. या अर्थपूर्ण व्यवहारास विरोध दर्शवण्यासाठी शिवसैनिकांनी अधिका-यांच्या टेबलावरच थेट लक्ष्मीपूजा आरंभली. कलशामध्ये पाने, फुले, श्रीफळ रचून त्याची भटजींकरवी पूजा मांडण्यात आली. याच वेळी शिवसैनिक अधिका-यांच्या लक्ष्मीदर्शनाविरोधात घोषणा देत होते.
मंडळाचे अधिकारी कदम यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन कार्यवाहीच्या अहवालाची प्रत शिवसैनिकांना देण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर शिवसैनिकांनी आंदोलन मागे घेतले.