गोरगरिबांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेणाऱ्या या सरकारची मती भ्रष्ट झाली आहे. महाराष्ट्र सरकारने  शैक्षणिक धोरणाला ठेंगा दाखवणारा आदेश काढून राज्यातील शाळांचे खासगीकरण करण्याचा कुटिल डाव आखलेला असल्याची टीका ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी शुक्रवारी येथे केली. शिक्षण वाचवा महामोर्चाप्रसंगी ते बोलत होते. शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या वतीने आज येथे शिक्षक आणि पालकांचा मोर्चा काढण्यात आला.

ज्या राज्यात राजर्षी शाहूंनी शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले त्याच कोल्हापुरात शिक्षण बचावासाठी मोर्चा निघणे  म्हणजे शिक्षण खात्याचे धिंडवडे निघण्यासारखे आहे, अशी टीका  एन. डी. पाटील यांनी केली. राज्यात कित्येक प्रश्न, समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. शेतकऱ्यांचा मोर्चा हे ताजे उदाहरण आहे. पण शैक्षणिक धोरणाबाबत सरकार काहीतरी कायदेशीरपणे निर्णय घेतील असे वाटत होते, पण तो भ्रम होता. आज १३०० शाळा बंद पडू दिल्या तर पुढे जाऊन सरकार १३  हजार शाळा बंद पाडायला मागे पुढे पाहणार नाही, असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला.

कृती समितीचे प्रमुख अशोक पवार यांनी  प्रास्ताविक केले. रमेश मोरे, गिरीश फोंडे, भरत रसाळे, गणी आजरेकर, सुधाकर सावंत, राजेश वरक, वसतराव मुळीक, संभाजीराव जगदाळे, सुभाष देसाई, महादेव पाटील, राजाराम सुतार, दिनकर कांबळे, सुधाकर निर्मळे, लाला गायकवाड, सुनील गणबावले, अनिल सरक, विलास पिंगळे, राजेंद्र कोरे, सुजाता निगवेकर, गिरिजा जोशी आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले.