20 January 2018

News Flash

शेतकरी कर्जमाफीसाठी शिरोळमध्ये राष्ट्रवादीचा मोर्चा

शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. उत्पादनाला हमीभाव मिळत नाही.

प्रतिनिधी, कोल्हापूर | Updated: April 18, 2017 1:25 AM

शासनाने शेतकरी कर्जमुक्त करण्याचा निर्णय घ्यावा, या मागणीसाठी शिरोळ येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चासमोर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस  राजेंद्र पाटील-यड्रावकर.  

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, या मागणीकरिता सोमवारी शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे  दुर्लक्ष करणाऱ्या शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कर्जमाफी झाली नाही तर मे महिन्यात अंकली टोलनाक्यावर रास्ता रोको आंदोलन करून हा लढा तीव्र करण्याचा इशारा  या वेळी देण्यात आला.

शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. उत्पादनाला हमीभाव मिळत नाही. राज्य व केंद्र शासन शेतकऱ्यांच्या हिताविरोधी निर्णय घेत आहे. त्यामुळे देशातील सर्वच शेतकरी आíथक अरिष्टात सापडले आहेत. कृषिप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत देशात शेतकऱ्यांना वालीच राहिला नाही. त्यामुळे शासनाने शेतकरी कर्जमुक्त करण्याचा निर्णय घ्यावा, या मागणीसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

या मोर्चासमोर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र पाटील-यड्रावकर  म्हणाले, शासनाने शेतकरी हिताविरोधी निर्णय घेऊन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यासाठी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून संघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. पहिल्या टप्प्यात मोर्चाद्वारे शासनाला जाग आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. सातबारा कोरा झाल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. या मागणीचे निवेदन तहसीलदार किरणकुमार काकडे यांना देण्यात आले. काकडे यांनी आपल्या भावना शासनास कळवू, असे आश्वासन दिले.

या मोर्चात शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश पाटील-टाकवडेकर, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष अमरसिंह पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, पं. स. सभापती मल्लाप्पा चौगुले, माजी उपसभापती राजू कुरडे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रा. अण्णासाहेब काणे यांनी मनोगतातून शासनाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.

First Published on April 18, 2017 1:25 am

Web Title: ncp protest on farmer debt waiver
  1. No Comments.