शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे शासनाकडून जोरदार ढोल वाजवले गेले. मात्र, यातील तृटीही आता समोर आल्या आहेत. कारण, गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र वाटप करताना रक्कम लिहीली नसलेली प्रमाणपत्रे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते वितरित करण्यात आली. या प्रकारामुळे या कार्यक्रमात चांगलाच गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे नेमकी किती रुपयांची कर्जमाफी झाली याबद्दल शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. कर्जमाफी प्रकारणातील गोंधळ लक्षात आल्यावर प्रमाणपत्रावर रक्कम टाकून चूक सुधारण्याचा प्रयत्न केला गेला.

राज्य सरकारने घोषित केलेला ‘शेतकरी कर्जमुक्ती प्रमाणपत्र वितरण’ कार्यक्रम बुधवारी येथे आयोजित केला होता. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील दोन शेतकऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. २५ शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. महाराणी ताराबाई सभागृहात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी कर्जमाफी झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना साडी-चोळी आणि धोतर देऊन सन्मान करण्यात आला आणि कर्जमाफीचे प्रमाणपत्रही वाटप करण्यात आले.

जोरदार हवा केलेल्या कर्जमाफीसाठी आजचा दिवाळीचा मुहूर्त साधला होता. पण रक्कम नसलेले प्रमाणपत्र हाती पडल्याने शेतकऱ्यांवर शिमगा करण्याची वेळ आली. प्रमाणपत्रावर रक्कम नसल्याने गोंधळ निर्माण झाला. या निमित्ताने कृषी विभागासह प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. अखेर प्रमाणपत्रावर रक्कम लिहिण्यात आल्यानंतर हा गोंधळ मिटला.