वळिवडे गावात जागवल्या मदतीच्या आठवणी

कोल्हापूर : ‘आपल्यासाठी आमच्या मनाची कवाडे उघडी होती, ती पुढेही खुली राहतील’ अशा शब्दांत पोलंडचे राजदूत अ‍ॅडम बुरोकोस्की यांनी मंगळवारी कोल्हापुरात कोल्हापूरकरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

दुसऱ्या महायुद्धावेळी पोलंडच्या निर्वासितांना कोल्हापूर संस्थानने आश्रय दिला होता. या घटनेला आता ८० वर्ष पूर्ण होत आहेत. या पाश्र्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी पोलंडच्या राष्ट्रपतींना कोल्हापूर भेटीचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार आज येथे पोलंडहून आलेल्या चमूने महावीर गार्डन येथील स्मृती स्तंभाला आदरांजली वाहिली.

येथील कार्यक्रमात बोलताना बुरोक्वोस्की यांनी कोल्हापूर—पोलंड  स्नेहबंधाच्या आठवणींना उजाळा देत आपले नाते अजूनही घट्ट बनेल असे नमूद केले. यावेळी त्यांनी भारतीय संस्कृतीचे कौतुक करत दोन्ही देशातील संस्कृती आणि शिक्षणासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

पोलंडवासीयांना कोल्हापूर संस्थानने वळीवडे येथे आसरा दिला. वळिवडे कॅम्पच्या आठवणी आजही आमच्या स्मरणात असल्याचे सांगून पोलंडचे राजदूत अ‍ॅडम बुरोकोस्की यांनी वळिवडेत जुन्या आठवणींची सय वळिवडे येथे एका कार्यक्रमात काढली.  बुरोकोस्की यांच्यासह उच्चायुक्त डेमियन आयरझीक, सल्लागार रॉबर्ट डेझीडिस्क व सचिव इवा स्तानिकोविका या पोलंडवासियांनी वळिवडे -गांधीनगरला भेट दिली. त्यावेळी युवराज शाहू महाराज हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या स्वागत समारंभात बुरोकोस्की बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार संभाजीराजे छत्रपती होते. बुरोकोस्की म्हणाले,कोल्हापूरकरांचे दातृत्व, प्रेम व जिव्हाळा पोलंडवासीय कदापि विसरणार नाहीत. पोलंडवासीयांच्या दु:खात सहभागी होऊन कोल्हापूरकरांनी दिलेले योगदान, ऋण कदापि न फिटणारे आहेत. आम्ही भारतमातेचे कृतज्ञ आहोत. आपल्या महनीय कर्तृत्वातून भारताने आपली ओळख शांतताप्रिय देश म्हणून वेळोवेळी सार्थ केली आहे. आम्ही पोलंड वासीय त्याचे साक्षीदार आहोत.

पद्म पथकाचे तत्कालीन सदस्य डी.बी. जाधव व बापू शिंदे यांनी पोलंड वासीयांबरोबर वळिवडे कॅम्पमध्ये खेळलेल्या हॉकी व फुटबॉलच्या आठवणी सांगितल्यावर पोलंडचे राजदूत गहिवरले. परनिका काशिकर, अशोक काशिकर यांची भाषणे झाली. कॅप्टन शिवाजीराव महाडकर यांनी प्रस्ताविक केले.  प्रा. डॉ. प्रवीण जाधव व पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले.