X
X

कोल्हापूर परिवहन सभापतीविरुद्ध पोलिसांना धक्काबुक्कीचा गुन्हा

READ IN APP

गर्दी हटवण्यासाठी उपनिरीक्षक पांढरे यांनी नगरसेवक चव्हाण यांना निघून जाण्याची सूचना केली.

कोल्हापूर : ‘व्हीनस कॉर्नर’ येथे पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की केल्याबद्दल महानगरपालिकेचे परिवहन सभापती राहुल सुभाष चव्हाण (रा. शाहूपुरी दुसरी गल्ली, कोल्हापूर) यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस उपनिरीक्षक सचिन पांढरे यांनी या बाबत फिर्याद दिली.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास व्हीनस कॉर्नर येथील हॉटेल व्हीनसमध्ये एका तालीम मंडळाचे कार्यकर्ते आले. त्यांनी हॉटेल मालकांकडे जेवणाची मागणी केली. हॉटेल बंद झाल्याने जेवण मिळणार नाही, असे सांगितल्याने कार्यकर्त्यांनी हॉटेल मालकांशी वाद घातला. काही कार्यकर्त्यांनी याची माहिती नगरसेवक राहुल चव्हाण यांना मोबाइलवरून दिली. काही वेळात चव्हाण चार ते पाच तरुणांसह व्हीनस चौकात पोहोचले.

दरम्यान, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन पांढरे हे गस्त पथकासह व्हीनस कॉर्नर चौकात पोहोचले होते. नगरसेवक चव्हाण यांनी तालीम मंडळाचे कार्यकर्ते आणि हॉटेल मालकातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. गर्दी हटवण्यासाठी उपनिरीक्षक पांढरे यांनी नगरसेवक चव्हाण यांना निघून जाण्याची सूचना केली. याचा राग आल्याने चव्हाण यांनी पोलिसांशी हुज्जत घालत शिवीगाळ केली. मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांना त्यांनी धक्काबुक्की केली. अखेर काही कार्यकर्तेच त्यांना घेऊन निघून गेले. डय़ुटीवरील पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की केल्याबद्दल उपनिरीक्षक पांढरे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात चव्हाण यांच्यावर सरकारी कामात अडथळा केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. चव्हाण यांना ताब्यात घेण्यासाठी सोमवारी सकाळी पोलीस त्यांच्या घरी गेले होते, मात्र ते महानगरपालिकेत गेल्याची माहिती मिळाली. दिवसभर दोन पोलीस महापालिकेच्या गेटवर थांबून होते, मात्र रात्री उशिरापर्यंत चव्हाण यांना अटक झाली नव्हती.

20
X