दयानंद लिपारे, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळाची तीव्रता असली तरी येथील उसाचा गोडवा कमी होण्याची चिन्हे नाहीत. या दुष्काळी जिल्ह्यात यंदाही उसाचे गाळप जोमदारपणे सुरू आहे. गतवर्षीच्या तुलनेत गाळपात घट झालेली नाही. उसाच्या उताऱ्यावर मात्र मतभेद दिसून येतात. पुढील वर्षी उसाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोल्हापुरातील दुष्काळ तांत्रिक स्वरूपाचा असल्याने त्याची तीव्रता जाणवत नसल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

कोल्हापूर जिल्ह्य़ावर वरुणराजाची कृपा असते. मायंदाळ पाऊस होत असल्याने शेतीही बारमाही फुललेली असते. ऊस, भात याचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. दोन्ही पिकांना पाण्याची मुबलक गरज असते. यंदा पावसाची अवकृपा झाल्याने राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. जलसमृद्ध कोल्हापूर जिल्ह्य़ातही २०१ गावांत दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. प्रशासकीय यंत्रणाही दुष्काळाच्या नियमाप्रमाणे कार्यरत झाली आहे. मात्र, दुष्काळाची तीव्रता असताना नगदी पीक असणाऱ्या उसाचे गाळप मात्र जोमाने सुरू आहे.

गाळप जोरात

कोल्हापूर जिल्ह्य़ात सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांमधून उसाचे गाळप नेहमीप्रमाणे होताना दिसत आहे. दुष्काळाची छाया त्यावर पडल्याचे जाणवत नाही. गाळपाचे आकडेही बोलके आहेत. गतवर्षी, म्हणजे सन २०१७-१८ मध्ये १६ सहकारी साखर कारखान्यांमध्ये ९७.५३ लाख टन उसाचे गाळप होऊन १२२.५९  लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेण्यात आले होते. तर, ७ खाजगी कारखान्यांनी ३६.३४ लाख टन गाळप करून ४३.०४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेण्यात आले. एकूण १३३.३८ टन उसाचे गाळप होऊन १६८.६४ क्विंटल साखरेचे उत्पादन घेण्यात आले होते. यंदाचा हंगाम आता काहीसा उतरणीला लागला आहे. काही मोठे कारखाने मार्चच्या मध्यापर्यंत गाळप करतील अशी चिन्हे आहेत. दुष्काळछाया असतानाही उसाच्या गाळपात लक्षणीय बदल झाल्याचे दिसत नाही. कोल्हापूर जिल्ह्य़ातील गाळपाची ताजी आकडेवारी हेच अधोरेखित करते. कोल्हापूर येथील साखर सहसंचालक कार्यालयातून मिळालेल्या आकडेवारीनुसार २० फेब्रुवारीपर्यंत १२२.६५ लाख टन उसाचे गाळप झाले आहे, तर १३८.६० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. यामध्ये १५ सहकारी साखर कारखान्यांचे ८०.२१ लाख टनापासून ९८.१४ क्विंटल साखरेचे आणि ७ खाजगी कारखान्यांचे ३२.४४ टन उसापासून ४०.४६ क्विंटल साखरेचे उत्पादन याचा समावेश आहे. हे आकडे पाहू जाता उसाचे गाळप आणि साखरेचे उत्पादन यामध्ये अंतर अधिक असल्याचे दिसत नाही. हंगाम समाप्तीचे आकडे हाती आल्यानंतर ते गतवर्षी इतके असतील, असे सांगितले जात असल्याने कोल्हापुरात दुष्काळातही उसाचा गोडवा कायम राहिला आहे. उसाच्या उताऱ्याबत काही मतभेद दिसतात. काहींच्या मते त्यामध्ये घट झाली असल्याने साखरेच्या उत्पादनातही कमी झाली आहे, तर काही कारखान्यांच्या व्यवस्थापनाने उताऱ्यात फारसा फरक  नसल्याचे सांगितले. राज्याच्या तुलतेत तर कोल्हापूरची उताऱ्याची आघाडी कायम आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण

दुष्काळी स्थितीमध्ये शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका शासनाची असली, तरी यंदा शेतकऱ्याला गतवर्षीच्या तुलनेत कमी रक्कम मिळणार आहे. गेल्या हंगामात उसाला एफआरपी अधिक २०० रुपये प्रतिटन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यंदा सुमारे २७०० रुपये प्रतिटन असा दर मिळत आहे. यातून शेतकऱ्यांना टनामागे

५० ते १०० रुपये अधिक मिळत असल्याचे दिसत असले तरी त्यामध्ये तथ्य नसल्याचे शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे. गेल्यावर्षी ९.५० उताऱ्याला २५५० रुपये दर होता. यावेळी उतारा निकष बदलण्यात आले. यावेळी  उताऱ्याला २७५० रुपये भाव जाहीर झाला आहे. ‘गेल्यावर्षी शेतकऱ्यांना अधिक २०० रुपये प्रमाणे देयक मिळाले. आता केवळ एफआरपीवर समाधान मानावे लागणार आहे. यावेळी प्रतिटन ५० ते १०० रुपये कमी दर मिळणार असून दुसरीकडे ऊस पिकवण्याचा खर्च वाढला असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्याला गोडवा चाखावा अशी स्थिती नाही’, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

सरधोपट नियमाने दुष्काळ

कोल्हापूर जिल्ह्य़ामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. २०१ गावांमध्ये नियमाबरहुकूम यंत्रणा कार्यरत आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्य़ाला अध्याप तरी दुष्काळाची म्हणावी तशी झळ लागल्याचे जाणवत नाही. याचे कारण कोल्हापुरातील दुष्काळ हा तांत्रिक स्वरूपाचा असल्याकडे अधिकारी लक्ष वेधतात. दुष्काळ जाहीर करण्याच्या पद्धती, निकष याला कारणीभूत आहेत. यातील तिसरा निकष कोल्हापूरच्या बाबतीत महत्त्वाचा ठरला आहे. जिल्ह्य़ातील ७६ मंडळापैकी १६ मंडळात कमी पाऊस पडला आहे. सरासरीच्या ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झाला असल्यास तो भाग दुष्काळी सदरात गणला जातो. २१० गावे या निकषात बसली असल्याने जिल्ह्य़ात दुष्काळ आहे. जिल्ह्य़ातील पश्चिमेकडील भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे. येथील गगनबावडय़ामध्ये वार्षिक सरासरी पाच हजार मि.मी. पाऊस असतो. त्यामानाने पूर्वेकडील तालुक्यांमध्ये कमी म्हणजे वार्षिक सरासरी ५०० मि.मी. पाऊस असतो. मुळातच कोल्हापूरची पावसाची वार्षिक सरासरी उत्तम प्रकारची आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले तरी पडणारा पाऊस हा पीक तगवण्यास पुरेसा ठरतो. खेरीज, जिल्ह्य़ात सिंचनाची व्यवस्था चांगल्या प्रकारची असल्याने आताही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे दुष्काळाच्या सरधोपट नियमात कोल्हापूर जिल्हा बद्ध झाला असला तरी दुष्काळाच्या भीषणतेची स्थिती येथे जाणवत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.