अमृत योजनेतून वारणा नळपाणी पुरवठा योजनेच्या जॅकवेलसाठी २५ गुंठे जागा खरेदीच्या विषयावर बोलविलेली विशेष सभा फारशी चर्चा न करता अवघ्या चार मिनिटातच आटोपती घेण्यात आली. सरकारी दराऐवजी खासगी वाटाघाटीने ही जागा खरेदी संदर्भात नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, पाणी पुरवठा सभापती व मुख्याधिकारी यांची समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला.
इचलकरंजी शहरासाठी वारणा नदी (दानोळी) उद्भव धरुन पाणी पुरवठा योजनेच्या जॅकवेलसाठी २५ गुंठे जागा खरेदी करणेसाठी चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी गुरुवारी नगरपालिकेची विशेष सभा बोलविली होती. सभेसाठी गणपूर्तीची आवश्यकता असल्याने पहिली पंधरा मिनिटे सदस्यांची प्रतिक्षा करण्यातच गेले. सभेला सुरुवात होताच नगरसेवक भिमराव अतिग्रे यांनी गणपूर्ती संदर्भात आक्षेप घेताना आवश्यक सभासद उपस्थित आहेत का सवाल उपस्थित केला. त्यावर सदस्यांची संख्या मोजण्यात येऊन गणपूर्ती असल्याने सभेला सुरुवात करण्यात आली.
शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजितमामा जाधव यांनी ही जागा खरेदी करताना सरकारी दराऐवजी खाजगी वाटाघाटीने अशी दुरुस्ती करण्याची मागणी केली. त्यावर अतिग्रे यांनी खाजगी वाटाघाटीचा दर किती असावा याची निश्चिती करुनच चर्चा करावी. तो दर अव्वाच्या सव्वा असेल तर हा पसा कोठून येणार याचा खुलासा करण्याची व सभेच्या मंजुरीनंतर अंतिम करण्याची मागणी केली. अखेर या संदभार्त चार सदस्यांची समिती नेमून चर्चा केल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल असे ठरले. या वेळी चच्रेत पक्षप्रतोद सुनिल पाटील, रिवद्र माने, सौ. सुनिता मोरबाळे आदींनी चच्रेत भाग घेतला.
नगरसेवक शशांक बावचकर यांनी, आमदार सुरेश हाळवणकर यांनी काही दिवसापूर्वी नगरसेवकच मक्तेदार असल्याचा केलेल्या वक्तव्याचा संदर्भ घेत सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, जर असे कोण मक्तेदार असतील तर मुख्याधिकार्यानी त्यांची नांवे जाहीर करावीत. आमदार हाळवणकर हे एकीकडे माझ्या नेतृत्त्वाखाली सत्ता असल्याचे सांगतात तर दुसरीकडे पालिकेचे कामकाज दर्जाहीन असल्याचे सांगत वाभाडे काढतात, याचा नेमका अर्थ काय, त्याचा खुलासा व्हावा अशी नगराध्यक्षांकडे मागणी केली. अखेर नगराध्यक्षा बिरंजे यांनी जे नगरसेवक मक्तेदार असतील त्यांच्यावर मुख्याधिकारी १ एप्रिलपासून कायदेशीर कारवाई करतील असे सांगितले.