कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देऊन डॉक्टरकडून दहा लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून खंडणीची ८ हजारांची रोकडही पोलिसांनी जप्त केली. याबाबतची फिर्याद डॉ. रमेश श्रीपती पाटील (रा. कणेरीवाडी ता. करवीर) यांनी दिली होती. गेल्या १५  दिवसांपासून पाटील यांना कुटुंबासह ठार मारण्याची धमकी संशयित आरोपी फोनवरून देत होते.

सुभाष प्रल्हाद चव्हाण (वय २७ ), गणेश अप्पासाहेब पोवार (वय २२), शैलेश अनिल िशगे (वय २०, तिघेही रा. रुकडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. स्वप्नील कांबळे (सांगली) हा संशयित पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

डॉ. पाटील हे आयुर्वेदीक (बीएचएमस) डॉक्टर असून जागा खरेदी-विक्रीचा जोड व्यवसाय करतात. २३ मार्च रोजी दुपारी रमेश पाटील यांना मोबाइलवर १० लाख रुपयांच्या खंडणीसह धमकीचे सतत फोन येऊ लागले.  याकडे रमेश पाटील यांनी दुर्लक्ष केले होते. २ एप्रिल रोजी पाटील यांना पुन्हा धमकी व खंडणीचा फोन आला. या वेळी खंडणी मागणाऱ्यांनी  पाटील यांना ‘दहा लाख रुपये दिले नाहीस तर तुझ्या मुलांना मी सोडणार नाही’ अशी धमकी दिली. यानंतर पाटील यांनी हा व्यवहार तडजोड करून ४ लाख रुपयांवर आणला.

त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी गोकुळ शिरगाव पोलिसांच्या मदतीने सांगली फाटा येथे सापळा रचला. तेथे दोन संशयित रमेश पाटील यांच्या दिशेने आले. त्यांनी दुचाकीवरून आलेल्या दोघांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. चव्हाण पोलिसांच्या हाती लागला तर  पोवार याला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतला. यानंतर िशगे याला कणेरीवाडी येथून ताब्यात घेण्यात आले. िशगे याचे आजोळ कणेरीवाडी येथील आहे. डॉ.  पाटील यांच्या घरासमोरच िशगे याचे आजोळ असल्याचे पाटील यांची संपूर्ण माहिती त्याला मिळत होती.