गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून बाहेर फेकले गेलेले माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे हे स्वतच्या राजकीय अस्तित्वासाठी आता फुले-शाहू-आंबेडकर नामजप बाजूला ठेवून भाजपमध्ये प्रवेश घ्यायला गेल्या वर्षभरापासून उत्सुक आहेत. परंतु बलात्काराचा खटला अंगावर असल्यामुळे हा अडसर भाजप प्रवेशासाठी प्रा. ढोबळे यांना सतावत आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी असलेली नाळ कायम ठेवून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रा. ढोबळे यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. राष्ट्रवादीतून बाहेर पडण्यासाठी या पक्षातील (अजित पवार यांचा नामोल्लेख टाळून) दुसरी फळी कारणीभूत आहे. राष्ट्रवादीनंतर दुसरा समविचारी पक्ष म्हणून काँग्रेसमध्ये जाण्याची आपली तयारी होती. परंतु तेथेही प्रवेश घेण्यास अडचणी आल्या. अर्थात या अडचणी शरद पवार यांचे राजकीय शिष्य असलेले काँग्रेस पक्षाचे नेते सुशीलकुमार िशदे यांच्यामुळे आल्या नाहीत. िशदे यांचे आपल्यावर प्रेम कायम आहे, असा निर्वाळाही प्रा. ढोबळे यांनी दिला.
काँग्रेसमध्ये जाण्यास अडचण आल्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर शेवटी कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून वैचारिक तडजोड करून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे ठरविले होते.भाजपमध्ये गेले वर्षभर प्रवेश मिळाला नसला तरी हीच राजकीय भूमिका अद्यापि कायम आहे. मुंबईत बोरिवली पोलीस ठाण्यात आपल्याच शिक्षण संस्थेतील एका महिला कर्मचाऱ्याने आपल्याविरूध्द दाखल केलेल्या बलात्काराचा खटला प्रलंबित आहे. त्याचा निकाल लवकरच लागेल आणि आपला भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा होईल, असा प्रा. ढोबळे यांचा आशावाद आजही कायम आहे.
सद्यस्थितीत प्रा.ढोबळे यांनी मातंग समाजातील आपले प्राबल्य मजबूत करण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. शाहू शिक्षण संस्थेच्या माध्यमातून राज्यात २४ जिल्ह्यांतून सुमारे ७०० एकर क्षेत्रात प्रा. ढोबळे यांचे शैक्षणिक जाळे पसरले आहे. २००४ ते २००९ हा पाच वर्षांचा कालावधी वगळता १९८५ पासून ते २०१४ पर्यंत विधानसभेवर प्रतिनिधित्व केलेले आणि मंत्रिपद सांभाळताना वादग्रस्त विधाने करून प्रकाशात राहिलेले प्रा.ढोबळे हे आता पुन्हा भाजपचे दार ठोठावत आहेत.