कोल्हापूर : महापुराने उद्ध्वस्त झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यात मदतकार्यात आता राज्यभरातून विविध संस्था सहभागी होऊ लागल्या असून त्यामुळे आता या कामाला व्यापक स्वरूप येऊ लागले आहे. माणसांबरोबरच अनेक संस्थांच्या वतीने मुक्या जनावरांसाठीही मोठय़ा प्रमाणात मदतकार्य सुरू केले आहे.

महापुराने कोलमडलेले कोल्हापूर शहर गेल्या आठवडय़ात काही प्रमाणात सावरले आहे. तरी या आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचे मोठे कार्य अद्याप बाकी आहे. पडलेली घरे, पाण्यात बुडालेली घरे, संसार उपयोगी साहित्याला मिळालेली जलसमाधी, आजारी आणि हतबल माणसे, विपन्नावस्थेतील जनावरे आणि हळूहळू मार्गस्थ होणाऱ्या विविध व्यवस्था आणि या साऱ्या पाश्र्वभूमीवर हे कोलमडलेले जनजीवन पुन्हा रूळावर आणण्यासाठी शासकीय-निमशासकीय यंत्रणेच्या जोडीने विविध संस्था, स्वयंसेवक सध्या इथे काम करत आहेत.

शिवसेनेची जनावरांसाठी मदत

महापुराच्या विळख्यात अडकलेल्या नागरिकांसह जनावरांची वाताहत झाली. या जनावरांना सध्या चारा उपलब्ध होत नसल्याने आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावतीने विविध भागात जनावरांसाठी २००० पोती गोळी पेंड पशुखाद्यचे वाटप करण्यात आले.

वारांगनांनाही वाटप

पूरग्रस्त भागातील वारांगनांना सायबर महाविद्यालयातील दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागातर्फे जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. वारांगना सखी संघटनेच्या अध्यक्षा शारदा यादव, उपाध्यक्षा जयश्री मोरे, संघटनेच्या सदस्यांनी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांंना राखी बांधली.  आयूब सुतार,उमेश निरंकारी डॉ. दीपक भोसले,डॉ. प्रकाश रणदिवे उपस्थित होते.

‘सारस्वत’तर्फे एक कोटीची मदत

सारस्वत बँकेतर्फे पूरग्रस्तांसाठी एक कोटी रुपयाचा मदतनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ न बँकेचे अध्यक्ष गौतम एकनाथ ठाकूर, उपाध्यक्ष शशिकांत साखळकर, किशोर रांगणेकर, हेमंत राठी, कार्यकारी संचालिका स्मिता संधाने यांनी सुपूर्त केला.

शिंगणापूर पंप सुरु 

जलमय कोल्हापुरात पिण्याच्या पाण्याची तक्रार आजही कायम राहिली. आज महापुरात बुडालेल्या शिंगणापूर पंपिंग स्टेशन मधील पंप श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते चालू करण्यात आला. या द्वारे बावडा व कावळा नाका परिसरातील १८ प्रभागात पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे.

शिर्डी संस्थानचे औषधोपचार

पूरग्रस्तांना साथीचे रोग होऊ नयेत म्हणून शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानतर्फे २५ जणांचे वैद्यकीय पथक १० लाख रुपयांच्या औषधांसह दाखल झाले. सुमारे ५ हजारहून अधिक लोकांची तपासणी करुन या पथकांने औषधोपचार केले आहेत. त्यांच्याकडून या दोन्ही जिल्ह्य़ासाठी प्रत्येकी १ कोटीची मदत देण्यात आली आहे.

डोंगर खचून नुकसान

चंदगड तालुक्यातील नागवे गावातील नावळेवाडी येथील जंगलातील काही भागात भूस्खलन झाल्यामुळें शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. लोकांत घबराट निर्माण झाली आहे. नावळेवाडी जवळच्या जंगलात हत्ती गावाकडे येऊ नयेत यासाठी वन विभागाच्या वतीने चर खोदली आहे. चरात पाणी साचून राहिल्याने जमीन ठिसूळ झाल्याने चरजवळून जमिनीचे मोठय़ा प्रमाणात भूस्खलन झाल्याने जंगलाजवळील सुमारे एक एकरावर भात,नाचना,ऊस,काजू पिकांचे नुकसान झाले आहे.