सतेज पाटील यांचा खासदार महाडिकांवर हल्ला

कोल्हापूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला,  काँग्रेस संपविण्याचे काम केले तेच आता घरी येतो म्हणतात. ज्यांनी आमचा विश्वासघात केला आता त्यांना मदत करायची नाही, असा आमचा आणि कार्यकर्त्यांचा निर्णय झाला आहे, असे मत आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले. खंजीर खुपसणाऱ्याला मदत करायची का? असा सवाल त्यांनी या वेळी केला.

कोल्हापूर शहर जिल्हा युवक कॉंग्रेसच्यावतीने आयोजित परिवर्तन अभियानाचा सांगता समारंभ जवाहरनगर येथे झाला असता ते बोलत होते. या वेळी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, धीरज विलासराव देशमुख यांनी शासनाच्या धोरणांवर जोरदार टीका केली. आमदार पाटील यांनी लोकसभा निवडणुकीला खासदार धनंजय महाडिक यांना विरोध करणार असल्याचे काँग्रेसच्या व्यासपीठावरून सांगितल्याने पुन्हा एकदा काँग्रेस—राष्ट्रवादीच्या ऐक्यासमोर  प्रश्नचिन्ह लागले आहे.

आमदार पाटील म्हणाले, की गेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा दबाव होता. त्यामुळे त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा एकदा निवडणुका लागल्यानंतर लोक घरी येतो म्हणत आहेत . गेल्यावेळी सुध्दा असेच झाले होते हे लक्षात आहे. कॉंग्रेसचा कोणताही कार्यकर्ता विश्वासघातकी लोकांना मदत करणार नाही,  असा टोलाही पाटील यांनी महाडिक यांना लगावला.

पाटील म्हणाले, की विधानसभा निवडणुकीची काँग्रेसला काहीही अडचण येणार नाही.  कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे, जयवंतराव आवळे असे सर्व जण  एकत्र काम करणार आहोत. मोदी लाट असतानाही  महानगरपालिकेत २९ नगरसेवक कॉंग्रेसचे निवडून आले आहेत. तो वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.