दयानंद लिपारे

ऐन दिवाळीत शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी जुना वाद पुन्हा उकरून काढला. फुटकळ कारण पुढे करून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी, रयत क्रांती संघटनेचे नेते संस्थापक आमदार सदाभाऊ खोत, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी एकमेकांवर शरसंधान सुरू केले आहे. अशा आरोपातून काहीही सिद्ध होत नसल्याचा पूर्वेतिहास असताना पुन्हा तोच कित्ता गिरवला जात असल्याने त्याची शेतकऱ्यांत चर्चा आहे.

अलीकडे वेगवेगळ्या शेतकरी संघटना कार्यरत आहेत. खरे तर त्यातले बहुतांशी नेते हे ८०च्या दशकात राज्यात शेतकरी संघटनेची मोट बांधणारे दिवंगत नेते शरद जोशी यांचे कार्यकर्ते.

त्यांच्यासोबत काम करत या सर्वानी चळवळीचा श्रीगणेशा केला. राजकीय मतभेद होऊन जोशी यांच्यापासून बाजूला होत शेट्टी यांनी स्वाभिमानीचा वेगळा झेंडा रोवला. पुढे काही काळ रघुनाथदादा पाटील, सदाभाऊ खोत यांनीही शेट्टी यांच्या गळ्यात गळा घालून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काम केले. नंतर प्रत्येकाच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढीस लागल्या आणि एकत्र असणारे नेते वेगळ्या वाटेने गेले. कोणत्या ना कोणत्या पक्षाशी नवी राजकीय सोयरिक केल्यानंतर त्यांच्यातील दुरावा ही वाढत गेला. परिणामी दर चार-सहा महिन्यांनी कुठले ना कुठले तरी निमित्त शोधून एकमेकांवर टीका करण्याची संधी ते शोधत राहिले. टीकाटिप्पणीचा हा वग पाच-सहा वर्षे हा प्रकार उत्तरोत्तर रंगत चालला आहे.

दिवाळीतच वाद

दिवाळीच्या सणासुदीच्या काळात त्याची लज्जत चाखण्यात लोक गुंतले असताना शेतकरी नेत्यांना परत एकदा टीका सुरू केली. खरे तर या वेळी चर्चेला सुरुवात झाली तेव्हा त्याला सकारात्मक मांडणीची किनार होती. माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांच्याशी हातमिळवणी करण्याचे संकेत देणारे विधान केले. ‘राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो. आमच्या दोघांची विचारधारा एकसमान आहे. काही मुद्दय़ांवर मतभेद झाले; पण पुन्हा एकत्र येऊ शकतो,’ अशा आशयाचे विधान खोत यांनी करत टाळीसाठी हात पुढे केला. त्यावर शेट्टी-खोत या जुन्या मित्रांची हातमिळवणी होण्याच्या शक्यतेवर शेतशिवारात चर्चेला उधाण आले. पण शेट्टी यांच्या भूमिके ने पुन्हा वाद निर्माण झाला. ‘एकदा ‘स्वाभिमानी’ने ठराव करून त्यांना चळवळीतून काढून टाकले आहे. काहीही झाले तरी अशांना पुन्हा जवळ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’ असा टोकाचा पवित्रा घेतला. खोत यांना डिवचल्यावर त्यांनी पुन्हा शेट्टी यांच्यावर आगपाखड केली.

वादाचा त्रिकोण

शेट्टी-खोत यांच्यात वाद सुरू असताना रघुनाथदादा पाटील यांनी या दोघांवरही उसाच्या अर्थकारणावरून टीकास्त्र डागले. ‘इतर राज्यांत उसाला प्रतिटन ३४०० ते ४००० रुपये दर मिळत असताना महाराष्ट्रात तो एफआरपीइतकाच घुटमळत आहे. याला शेतकरी संघटनेतील नेत्यांना सत्तेचे पडलेले स्वप्न कारणीभूत आहे. सत्तेसाठी शेतकऱ्यांच्या डोळ्यात शेट्टी व खोत यांनी धूळफेक केली आहे. कारखानदारांची चर्चा करून थोडा दर वाढवून घ्यायचा आणि शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळवून दिले असे वातावरण करून त्याचे श्रेय संघटनेला द्यायचे. त्यातून स्वत:चा स्वार्थ साधायचा अशी दोघांची खेळी आहे,’ असा आरोप त्यांनी केला आहे. ‘रघुनाथ पाटील यांचे शेतकरी चळवळीतील स्थान डळमळीत झाले आहे. त्यांना फारसे कोणी गांभीर्याने घेत नसल्याने अधूनमधून आरोप करण्याशिवाय त्यांना काही काम राहिले नाही,’ असा चिमटा काढत शेट्टी यांनी त्यांचे आरोप फेटाळले.

मुख्य प्रश्न दुर्लक्षित

स्वाभिमानीचे राजू शेट्टी, रयतचे सदाभाऊ खोत, शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील या तीन नेत्यांनी एकमेकांवर शरसंधान सुरू केल्याने ऊस हंगाम भरात असताना, हमीभाव रेंगाळला असताना शेतकऱ्यांचा या मुख्य प्रश्नाकडे शेतकरी नेत्यांचे लक्ष नाही. एफआरपी कायद्याप्रमाणे ऊस गाळपाचे पहिल्या १५ दिवसांचे पैसे शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित असताना त्याबाबत हालचाली होत नाही. त्या विरोधात आवाज उठवण्याऐवजी या तीन नेत्यांनी एकमेकांवर परस्परांवर दुगाण्या झाडण्यात समाधान मानले आहे. त्यांच्या या प्रवृत्तीवर शरद जोशी संघटनेचे संघटक संजय कोले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना नाराजी व्यक्त केली. ‘एरवीचे आणि आताचेही आरोप-प्रत्यारोप केवळ राजकीय स्टंटबाजीतून होत आहेत. यातून शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न मात्र बाजूला पडले आहेत. प्रसिद्धीचा झोत आपल्याकडे राहावा यासाठीच सवंग प्रसिद्धीनाटय़ सुरू आहे,’ अशा शब्दात त्यांनी या तिन्ही नेत्यांचा समाचार घेतला आहे.