पाणीपुरवठा बंद केल्याने, त्रासलेल्या पाचगावच्या नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून चांगलीच पायपीट करावी लागत आहे. पाचगावचा पाणी पुरवठा तत्काळ सुरू करावा या मागणीसाठी सोमवारी शिवसेनेच्या वतीने घागरी, बादल्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या पाचगावात गेले कित्येक महिने पाणीपुरवठा होत नाही. पाचगाव आणि आजूबाजूच्या उपनगरांना पाणीपुरवठा करणारा मुख्य स्रोत कळंबा तलाव अाटल्याने या परिसरात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. उपनगरांचा नियोजनबद्ध विकास न झाल्याने ४० हजारहून अधिक नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाला जाग आणण्यासाठी पाचगावसह प्रगतीनगर, समृद्धीनगर, भोगम कॉलनी, अमृतनगर, पंचशील कॉलनी, पोवार कॉलनी, समर्थनगर, मगदूम कॉलनी, महादेव गल्ली, मराठा कॉलनी, साईनाथ पार्क, शिवनेरी कॉलनी या परिसरातील नागरिकांनी घरातील मोकळ्या घागरी, बादल्या घेऊन मोर्चा काढला. येत्या १५ दिवसांत पाचगावला नियमित पाणीपुरवठा न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी यावेळी दिला.
पाचगावला डिसेंबर महिन्यातच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गावाला आणि आजूबाजूच्या उपनगरांना पाणीपुरवठा करणारा कळंबा तलाव या वर्षी आटल्याने ही स्थिती निर्माण झली आहे. पाण्याचा मुख्य स्रोत आटल्याने पाणी विकत घेण्याशिवाय दुसरा पर्याय नागरिकांकडे उपलब्ध नाही. ग्रामपंचायतीने गिरगावमधून शेतीला पाणीपुरवठा संस्थेकडून पाणी आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे. मात्र हा प्रस्तावही जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहे. म्हणून शेकडो महिलांनी आजच्या मोर्चात पुढाकार घेतला आणि भर उन्हात हातात मोकळ्या घागरी आणि बदल्या घेऊन शासनाविरोधातील संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
गेल्या निवडणुकांमध्ये अनेक उमेदवारांकडून पाचगावकरांना पाण्यासाठी नुसती आश्वासने मिळालीत. परंतु आश्वासनांची पूर्तता आजअखेर झालेली नाही. राजकीय वादात अडकलेले पाणी पाचगावकरांना कधी मिळणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.