‘गोकू ळ’च्या मुख्य कार्यालयावर मोर्चा

कोल्हापूर :  गोकू ळ संघ हा राजकारणाचा मुद्दा बनवू नका, असे आवाहन अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी करून आठवडा लोटण्यापूर्वीच विरोधकांनी कामकाज पद्धतीवरून पुन्हा गोकूळच्या संचालक मंडळाला लक्ष्य केले आहे. गोकूळने पशुखाद्याच्या दरात अचानक भरमसाठ दरवाढ करून शेतकऱ्यांचा खिसा कापल्याबद्दल शिवसेनेने सोमवारी आंदोलन केले. ही दरवाढ मागे घेऊ न शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच दुधाला प्रति लिटर दोन रुपये दरवाढ द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेने गोकूळच्या मुख्य केंद्रावर संचालक मंडळाच्या बैठकीवर धडक मोर्चा काढला. या वेळी शिवसैनिकांकडून तीव्र निदर्शने करण्यात आली.

गोकूळ दूध संघाचा (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) कारभार दिवसेंदिवस वादाला निमंत्रण देत आहे. दुधाचे दर  कमी केल्याने आणि संघ बहुराज्य करण्याचे धोरण आखल्याने शेतकरी आणि सर्वपक्षीय विरोधकांकडून गोकूळच्या संचालक मंडळाला रोषाला सामोरे जावे लागत आहे. यातून बोध घेण्याऐवजी गोकूळकडून अचानक पशुखाद्याच्या दरात पोत्यामागे शंभर रुपयाची दरवाढ करण्यात आली. दूध उत्पादक शेतकऱ्यांचा या वाढीला तीव्र विरोध आहे.  त्यामुळे ही दरवाढ कमी करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला प्रति लिटर दोन रुपये मिळावेत यासाठी शिवसेनेच्यावतीने गोकूळ दूध संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयासमोर म्हशींसह मोर्चा काढण्यात आला होता. तसेच जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मात्र, आश्वासन देऊ नसुद्धा गोकूळ दूध संघाकडून ही दरवाढ मागे घेण्यात येत नसल्याने आज शिवसेनेच्यावतीने गोकूळ शिरगाव येथील गोकूळ दूध संघाच्या मुख्य केंद्रावरच संघाच्या संचालक मंडळाची बैठक सुरू असतानाच धडक मोर्चा काढण्यात आला. या वेळी गोकूळ दूध संघाच्या प्रवेशद्वारावर जाऊ न तीव्र घोषणा देण्यात आल्याने वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले होते.

गेल्या दोन आठवडय़ापासून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. त्याचे गांभीर्य गोकूळचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांना नसल्याचे सांगत शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी गोकूळच्या कारभारावर सडकून टीका केली. या वेळी जिल्हा प्रमुख संजय पवार यांनीही संचालकांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत त्यांना धारेवर धरले. दूध उत्पादनात खर्च वाढत असताना दुधाचे दर मात्र वाढत नाहीत. आंदोलन करूनही गोकूळ दूध संघाने शेतकऱ्यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप ही पवार यांनी या वेळी केला. अध्यक्ष आपटे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.