‘ना कसला चमत्कार, ना कसला नमस्कार, महापौर निवडीचा सहजसोपा पार पडला सोपस्कार’ अशी काहीशी अवस्था सोमवारी कोल्हापूर महापालिकेत पहायला मिळाली. सहकार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेला पंधरवडाभर महापौर निवडीत चमत्कार होणार असे पालुपद सुरु ठेवल्याने बहुमत असतानाही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे सावट पसरले होते. चिंतेच्या वलयातच महापौर निवडीचा कार्यक्रम सुरु झाला आणि कसलाही चमत्कार-नमस्कार न होताच काँग्रेस-राष्ट्रवादीने अनुक्रमे महापौर व उपमहापौर निवडीत बाजी मारत आपली नसíगक मत्री आणखीनच घट्ट केली.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा निकाल चक्रावून टाकणारा होता. सत्तेचा दावा करणाऱ्या भाजप-ताराराणी आघाडीला ३२ जागांवर विजय संपादित करता आला. काँग्रेसने सर्वाधिक २७ जागा मिळविल्या. राष्ट्रवादीचा सभागृहातील आकडा कमी होवून तो १५ वर आला. ३ अपक्षांनीही बाजी मारली. अशा स्थितीत महापौरपदाची खुर्ची कोणाकडे जाणार, याची उत्कंठा सर्वानाच लागली होती. पालकमंत्री पाटील यांनी राष्ट्रवादीशी संधान साधल्यानंतर भाजपाचा महापौर होणार, अशी घोषणा केल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली. खरेतर, निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या दोन्ही पक्षांना नसíगक मित्रत्वाची जाणीव होऊन एकत्रित सत्ता संपादन करण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी काँग्रेससोबत राहण्याचा निर्णय घेतला असला तरी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ वर्तुळातून ऐनवेळी निर्णय फिरवला जातो की काय, याची धास्ती त्यांनाही होती. पण राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक नेतृत्वाला निर्णयाची मुभा दिली होती. तरीही अखेरच्या क्षणापर्यंत पालकमंत्री आपलाच महापौर होणार, असे सांगत राहिल्याने कदाचित घोडेबाजार होऊन बदल होणार की काय, अशी शंका काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना लागलेली होती.
अशा वातावरणातच महापौर निवडीचा दिवस उजाडला. कराडला गेलेले काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य महापालिकेत साडेदहा वाजता पोहोचले. महापौरपदाच्या उमेदवार अश्विनी रामाणे या प्रथेप्रमाणे माजी मंत्री सतेज पाटील यांच्या वाहनातून महापालिकेत आल्या. दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांनी गुलाबी फेटे बांधत आपण एकसंध असल्याचे दाखवून दिले. त्यांनी गळ्यात पक्षाच्या चिन्हाचे स्कार्फ घातले होते. भाजप उमेदवारांनी पक्षचिन्हाचे तर त्यांचा मित्रपक्ष असलेल्या ताराराणी आघाडीने पिवळ्या रंगाचे स्कार्फ गळ्यात घातले होते. महापौर निवडीच्यावेळी दांडी मारलेले शिवसेनेचे ४ सदस्य सभागृहात पोहोचले ते भगवे फेटे बांधून. पण एकूण निवडीत आणि पहिल्याच सभेत शिवसेनेचे अस्तित्व नगण्य ठरले.
महापौर निवड प्रक्रिया सुरु झाल्यावर भाजपाच्या सविता भालकर यांना ३३ मते मिळाल्यावर काँग्रेसचे महापौर होणार हे जवळपास निश्चित होते. पण ऐनवेळी राष्ट्रवादीकडून आगळीक होणार का, याची काळजी काँग्रेस नगरसेवकांना होती. पण असा कोणताही चमत्कार-नमस्कार न होता साध्या सोप्या पध्दतीने महापौर निवडीचे सोपस्कार पार पडल्यावर उभय काँग्रेसच्या नगरसेवकांच्या चेहऱ्यावर समाधानाची लहर पसरली होती.