संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आíथक नाडी आणि जिल्ह्याचे महत्त्वाचे सत्ताकेंद्र समजल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची सहा जागांसाठी उद्या सोमवारी निवडणूक होत आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, आमदार दीपक साळुंखे, अक्कलकोटचे काँग्रेसचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे आदींचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. यात आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांच्या विरोधात त्यांचे कट्टर राजकीय विरोधक तथा भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या कन्या तथा सोलापुरातील भाजपच्या नगरसेविका शोभा बनशेट्टी यांनी दिलेले आव्हान मागे घेतले आहे. यात म्हेत्रे व पाटील यांच्यात झालेल्या दिलजमाईमुळे आमदार म्हेत्रे यांचा जिल्हा बँकेत प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
विधान परिषदेच्या सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोयीचे गणित घालून आमदार म्हेत्रे व पाटील यांचे मनोमिलन घडविण्यात आले आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी महत्त्वाचा पुढाकार घेतला होता. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकारणात सिद्रामप्पा पाटील हे मोहिते-पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात. अक्कलकोट तालुक्यात काँग्रेसचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे व सिद्रामप्पा पाटील यांच्यातील खूनखराब्यापर्यंत मजल गेलेले राजकारण सर्वानी जवळून पाहिले आहे. परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदार म्हेत्रे यांचे वाढलेले महत्त्व आणि त्यातून त्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत घेतलेली उडी त्यांना पोषक ठरली आहे.
विधान परिषद निवडणुकीत आपला मार्ग विजयासाठी सुलभ व्हावा म्हणून महायुती पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत ओबीसी गटाची जागा आमदार म्हेत्रे यांच्यासाठी सोडली होती. परंतु त्यांच्या विरोधात अक्कलकोटमधील स्पध्रेचे राजकारण आडवे आले आणि म्हेत्रे यांच्या विरोधात सिद्रामप्पा पाटील यांच्या कन्या शोभा बनशेट्टी यांनी आपली उमेदवारी आणली होती. तथापि, परिचारक यांना काटशह देण्याचा भाग म्हणून राष्ट्रवादीचे खासदार मोहिते-पाटील यांनी म्हेत्रे व पाटील यांच्यातील राजकीय वितुष्ट संपुष्टात आणून दोघांत दोस्ताना घडवून आणला आहे. त्यामुळे आमदार म्हेत्रे यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला मदत करावी लागणार आहे. तशी भूमिका आमदार म्हेत्रे यांनी औपचारिकपणे जाहीर केली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत १९ पकी १३ जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर राष्ट्रवादीअंतर्गत साठमारीच्या राजकारणात खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार दीपक साळुंखे यांना निवडणुकीस सामोरे जावे लागत आहे. यात दुसरीकडे सुधाकर परिचारक व त्यांचे पुतणे प्रशांत परिचारक तसेच माढय़ाचे संजय िशदे यांचे राजकीय अस्तित्व पणाला लागणार असल्याचे सांगितले जाते.