कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका हद्दीतील झोपडपट्टय़ांमध्ये शासन निर्णयाप्रमाणे गतीने विकासकामे व्हावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने महापालिकेसमोर सोमवारी निदर्शने केली. कामांना गती न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

शहरातील झोपडपट्टयासंदर्भात रमाई आवास योजनेत बांधकाम परवानगी देण्याबाबतची सुचना आयुक्तांनी २०१८ मध्ये नगर रचना विभागास दिली आहे. तसेच शासन निर्णयानुसार पात्र झोपडीची उंची १४ फूट वाढवण्यास परवानगी देण्याचे अधिकार महापालिकेस आहेत. तरीही महापालिका हद्दीतील झोपडपट्टीधारकांना न्याय मिळालेला नाही. विकासकामे रखडली आहेत. या भागाला सरकारने गलिच्छ वस्ती घोषित केले असतानाही खासगी स्वरूप देण्याचा प्रयत्न अधिकारी करत आहेत. हे प्रकार ताबडतोब थांबवावेत. उचगाव नाका, टेंबलाईवाडी झोपडपट्टीचे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर असे नामांतर करावे. या झोपडपट्टीस घरफाळा, झोपडीकार्डसह इतर शासकीय सुविधा त्वरित मिळाव्यात. सरकारने दिलेल्या हक्कापासून वंचित ठेवल्यास, सुविधा न दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमूद केले आहे.

धनाजी सकटे, राजन पिडाळकर, डॉ. प्रगती चव्हाण, प्रफुल्ल कांबळे, अश्विनी नाईक यांच्यासह झोपडपट्टीधारक सहभागी झाले होते.