19 October 2019

News Flash

कामगारांना मालक बनवणारे राज्याचे ‘मँचेस्टर’!

श्रमिकांच्या हाताला काम देणारी नगरी म्हणून वस्त्रनगरी इचलकरंजीची ओळख आहे. हा लौकिक ऐकूनच अनेकांची पावले इकडे वळली.

इचलकरंजीतील एक अद्ययावत पॉवरलूम.

दयानंद लिपारे

इचलकरंजीत अनेक यंत्रमाग कामगार बनले मालक

जीवनातील महत्त्वाची वर्षे कष्ट करण्यात व्यतीत केल्यानंतर मुंबईच्या गिरणी कामगाराची चाळीत स्वत:चे घर मिळवण्यात इतिश्री व्हायची. याचवेळी राज्याचे ‘मँचेस्टर’ असलेल्या इचलकरंजीत राबणाऱ्या कामगारांचे हळूहळू उद्योजकात  रूपांतर होऊ लागले आहे. ही किमया कामगाराला मालक बनवणाऱ्या या जादुई नगरीची आहे. कामगार ते मालक बनलेली अशी शेकडो उदाहरणे सध्या या वस्त्रनगरीत आता दिसू लागली असून हा प्रवास कामगारदिनी श्रमिकांची उमेद वाढवणारा आणि प्रतिष्ठाही मिळवून देणारा ठरला आहे.

श्रमिकांच्या हाताला काम देणारी नगरी म्हणून वस्त्रनगरी इचलकरंजीची ओळख आहे. हा लौकिक ऐकूनच अनेकांची पावले इकडे वळली. विदर्भ-मराठवाडय़ापासून ते उत्तर प्रदेश- बिहार, राजस्थानपासून ते आंध्र-तेलंगणापर्यंत, पश्चिम बंगालपासून ते अगदी जिल्ह्यच्या दक्षिणेकडील तालुक्यांपर्यंत; देशाच्या बहुतेक सर्व भागांतून आलेल्या कष्टकऱ्यांनी इचलकरंजीत श्रमाची पूजा बांधली. कालपर्यंत दुसऱ्यांच्या यंत्रमाग कारखान्यांत अहोरात्र राबणारे अक्षरश: हजारो हात आता स्वमालकीच्या कारखान्याचे मालक झाले आहेत. यंत्रमाग कामगार ते यशस्वी यंत्रमागधारक असा प्रवास करणाऱ्या कारखानदारांची नगरी अशी वेगळी ओळख उचलकरंजीची आहे. याला कोणत्याही गल्लीबोळातील धडधडणारे कारखाने साक्ष देण्यास तत्पर आहेत.

लोकमान्य टिळकांच्या सल्लय़ाने इचलकरंजीचे जहागीरदार नारायणराव घोरपडे यांनी १९०४ साली पहिला यंत्रमाग आणण्यासाठी विठ्ठलराव दातार यांना उद्युक्त केले. तेव्हापासून या नगरीत यंत्रमागची धडधड सुरू झाली. प्रारंभी, फॅक्टरी अ‍ॅक्टमुळे तिच्या वाढीचा वेग कमी राहिला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अबकारी विभागाने दोन मागासाठी परवाना देण्याचे धोरण स्वीकारले आणि त्यानंतर चित्र पालटले. किमान ऐपत असणारे माग घालू लागले, तर कामगार भाडय़ाने माग घेऊन राबू लागले. घराची भाऊ , पत्नी, मुले असा सारा बारदाना खपत असे. त्यातून हळुहळू  काही जण या मागांचे पुढे मालकही बनले. आझ ही संख्या या शहरात शेकडय़ाच्या घरात पोहोचली आहे. कालचा कामगार आता मालक म्हणून मिरवू लागला, त्याला प्रतिष्ठा मिळाली. गल्लोगल्ली अशा यशोकथा आकाराला आल्या आहेत.

साधा माग ते शटललेस लूम

कोणी उद्योजक काही कोटीची पुंजी घेऊ न आला आणि त्याने वाढवलेल्या उद्योगामुळे गावाचे नाव झाले असे सांगणाऱ्या अनेक यशकथा आहेत. पण ज्या उद्योगात हात राबले त्याच उद्योगाचा मालक आणि तेही शेकडोंच्या संख्येने हे मात्र इचलकरंजीतच पाहायला मिळेल. अनेक ठिकाणी पणजोबांनी सुरू केलेला यंत्रमागाचा कारखाना आता त्याच जोमाने पणतू चालवत आहे. फरक इतकाच पडला आहे की दोन-तीन दशकापूर्वी कारखानादाराकडे ३०-४० हजार रुपये किमतीची यंत्रमागांची जोडी असायची तिथे आता विदेशातील ३०-४० लाख रुपयांचा एक असे डझनावारी अद्ययावत शटललेस लूम दाखल झाल्या आहेत.

First Published on May 1, 2019 2:11 am

Web Title: states manchester is the owner of the workers