महाद्वार रोड, ताराबाई रोड भागात पुराचे पाणी

कोल्हापूर महापालिकेचा पावसाच्या पाणी निचरा होणारा ‘स्ट्रार्मवॉटर प्रकल्प’ दहा वर्षांनंतरही कूचकामी ठरला आहे. २००५ सालच्या प्रलयकारी महापुराच्या पाश्र्वभूमीवर वाजत गाजत आणलेल्या प्रकल्पाची दैन्यावस्था उडाली आहे. ७५ कोटी रुपये खर्चाचा ‘स्ट्रार्म वॉटर प्रकल्प’ नियोजन शून्यतेच्या गाळात अडकला आहे. प्रकल्प राबविल्यामुळे पाणी साचणाऱ्या भागातील पाणी कायमचे हटणे अपेक्षित असताना ते होणे दूरच उलट करवीर निवासिनीचे वास्तव्य असलेला महाद्वार रोड, ताराबाई रोड या मध्यवर्ती भागासह कधीही पाणी न साचणाऱ्या भागात पुराच्या पाण्याने प्रवेश केल्याने हा प्रकल्प अपयशी ठरला आहे. ड्रेनचे २० कि.मी. कामापकी उर्वरित ९ कि.मी.चे काम करता येणार नसल्याचे महापालिका प्रशासनाने कबूल केल्याने या प्रकल्पावर अपयशाचे काळे ढग जमले आहेत.

२००५ सालच्या महापुराच्या आठवणीने आजही अंगावर भीतीचा काटा येतो. शहरातील मध्यवर्ती भागात महापुराचे पाणी शिरल्याने एका मार्गाकडून दुसरीकडे जाण्यासाठी बोट वापरण्याची वेळ आली. यापासून बोध घेत महापालिकेने  ७५ कोटी रुपये खर्चाचा स्ट्रॉर्म वॉटर प्रकल्प राबण्याची ठरवले. पण दशकभराचा  कालावधी उलटला तरी तो ना पूर्णत तडीस गेला, ना त्याद्वारे दोषांचे निराकरण झाले. गेल्या चार दिवसांत शहरात जागोजागी पाण्याचे तळे साचल्याने या योजनेचा बोजवारा कसा उडाला हेच प्रकर्षांने दिसून आले.

शहरातील नाले, गटर्स व चॅनेल सफाईचे काम पूर्ण झाल्याचे आढावा बठकीत महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले होते. पण एकाच जोरदार पावसाने शहरात जी स्थिती निर्माण झाली, त्यावरून सफाईचा कांगावा उघड झाला. रस्त्याकडेच्या नळ्यांमधील खरमाती तसेच कचरा न काढल्याने तसेच नळ्यांची आणि रस्त्याची पातळी यात फरक असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. चेंबर व्यवस्थित बांधली नसल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा होतो. अनेक घर, तळघरे यामध्ये पाणी घुसल्याने त्यांचे आíथक नुकसान झाले आहे. स्टॉम वॉटर प्रकल्पातून बांधलेले चॅनेलमधील खरमाती ठेकेदारांनी काढलेली नाही. त्याच्या निचऱ्याची व्यवस्था केलेली नसल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता अगोदरच वर्तवली गेली होती. तरीही, पावसाच्या पाण्यामुळे गरसोय होणाऱ्या ठिकाणांची नगरसेवकांनी पाहणी करण्याचे किती कष्ट घेतले आणि अधिकाऱ्यांना आदेश काय दिले याचे संशोधन व्हावे असा सारा मामला आहे.

आषाढातील दमदार पावसाने शहरासह उपनगर परिसरांतील नागरिकांची दैना उडाली आहे. काही वर्षांपासून शहरातील ड्रेनेज व्यवस्था पार कोलमडल्याची केवळ चर्चा सुरू असते. पाऊस आला, की चर्चा नव्याने जोर पकडते. जुन्या योजनांचे नव्याने आराखडे पुढे येतात. पावसाळा होईपर्यंत हे गुऱ्हाळ सुरू राहते.  त्यामुळेच आता नगरसेवक स्ट्रॉर्म वॉटर प्रकल्प आणल्याचा काय उपयोग झाला, असा सवाल प्रशासनाला करीत आहेत.

७५ कोटीचा स्ट्रॉर्म वॉटर प्रकल्प मंजूर आहे. रस्तेकडेला ड्रेनसाठी व नाल्याच्या बाजूस िभत बांधण्यासाठी निधी आला आहे. नाल्याच्या बाजूच्या िभतीचे काम ९० टक्के काम पूर्ण झाले आहे, असे समाधानकारक उत्तर देणाऱ्या प्रशासनाला रस्त्याकडेच्या ड्रेनचे २० कि.मी. कामापकी केवळ ४ कि.मी. काम पूर्ण झाले आहे.  उर्वरित ५ कि.मी. पकी फक्त ८०० मीटर काम पूर्ण आहे. उर्वरित ९ कि.मी.चे काम करता येणार नाही, असे सांगून योजनेचा बोजवारा उडाल्यावर अधिकारीच शिक्कामोर्तब करत आहेत. यामुळे महापुराचा फटका पुन्हा बसल्यास कोल्हापूरकरांच्या हाल आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.