साखरेचे दर कोसळल्याने चिंता

कोल्हापूर जिल्ह्यतील पूर्व भागातील तीन साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तीनशे रुपयांचा दुसरा हप्ता देण्याचे जाहीर केल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या नजरा अन्य साखर कारखाने आपल्या हप्त्याची रक्कम कधी जाहीर करणार याकडे लागल्या आहेत. तर साखरेचे घसरत चाललेले दर पाहता साखर कारखाने आगामी हप्ता किती रकमेचा देणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर जाहीर केलेली दुसऱ्या हप्त्याची रक्कम अपुरी असून ती शेतकऱ्यांची फसवणूक करणारी असल्याचे म्हणत शेतकरी संघटनांनी अधिक रक्कम मिळावी यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला असल्याने दुसरा हप्त्याचे अर्थकारण तापण्याची चिन्हे आहेत.

गतवर्षीचा ऊस गळीत हंगाम सुरू होतानाच एफआरपीवरून वाद सुरू झाला होता. अखेरीस साखरेचे वाढलेले दर विचारात घेऊन एफआरपी अधिक पावणे दोनशे रुपये पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यतील बहुतेक सर्व साखर कारखान्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली. अर्थात त्याला साखरेच्या दराने घेतलेली उसळी आणि उसाची कमी उपलब्धता यामुळे निर्माण झालेली स्पर्धा कारणीभूत ठरली.

ऊस नियंत्रण कायद्याचे उल्लंघन

उसाची स्पर्धा अटळ असल्याने शेतकऱ्यांना आकर्षति करण्यासाठी साखर कारखान्यांनी दुसरा हप्ता देण्याचे धाडस केले आहे. मात्र यावर शेतकरी संघटना नाराज आहेत. ज्या कारखान्यांनी दुसरा हप्ता दिला आहे तो  शेतकऱ्यांची फसवणूक करणारा असल्याचा आरोप आंदोलन अंकुशचे धनंजय चुडमुंगे यांनी केला आहे. साखर कारखान्यांची ही कृती ऊस नियंत्रण कायद्याचे उल्लंघन आहे. कायद्याने व हिशोबाने अजून २५० ते ३०० रुपये प्रति टन कारखान्यांना द्यावे लागणार असताना हाच अंतिम दर आहे असे कारखानदार भासवत आहेत.  ऊस नियंत्रण मंडळाच्या बठकीत होणारा दर हा अंतिम दर असेल व तो दर कारखान्यांना द्यावाच लागेल.  त्यामुळे दिवाळीला १५० रुपये देतो म्हणणे ही फसवणूक असून आंदोलन अंकुश संपूर्ण न्याय मिळावा म्हणून संघर्ष चालूच ठेवणार असल्याचे गुरुवारी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

साखर कारखाने आíथक कोंडीत

२०१६-१७ या हंगामाची सांगता होऊन तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. आता कारखान्यांना आगामी हंगामाचे वेध लागले आहेत. यंदाही साखर कारखान्यांना उसाची स्पर्धा अटळ आहे. हा मुद्दा लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यतील जवाहर, श्री दत्त व शरद या तीन साखर कारखान्यांनी तातडीने १५० रुपये व दिवाळीला १५० रुपये असा तीनशे रुपये ज्यादाच ऊस दर जाहीर केला आहे. यामुळे आता अन्य साखर कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी आमचे कारखाने ज्यादाच दर  कधी देणार याची प्रतीक्षा करत आहेत. पश्चिमेकडील भागात साखर उतारा अधिक असल्याने या कारखान्यांकडून अधिक रकमेचा दुसरा हप्ता मिळावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याचवेळी साखरेचे दर उतरू लागले आहेत. त्याची काळजी साखर कारखाना व्यवस्थापनाला लागली आहे. दुसरीकडे शेतकरी संघटना दुसरा हप्ता मिळालाच पाहिजे यासाठी आक्रमक होत आहेत. त्यामुळे साखर कारखानाने आíथक कोंडीत सापडले आहेत.