घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या मुंबईतील दादर येथील ‘राजगृह’ येथे काही अज्ञात लोकांनी धुडगूस घातल्याप्रकरणी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या युवक आघाडीने बुधवारी कोल्हापूरातील बिंदू चौकात निदर्शने केली. हल्लेखोरांना पकडून अटकेची कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दादर येथे ‘राजगृह’ या निवासस्थानी आपला ग्रंथखजिना जपून ठेवला आहे. या निवासस्थानी काही अज्ञात हल्लेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेरा, रोपांच्या कुंड्या, खिडक्यांच्या काचांची मोडतोड केली. या घटनेचा राज्यभरात आंबेडकरी संघटना, राजकीय व्यक्ती आणि मंत्र्यांनी निषेध नोंदवला.

कोल्हापूर येथील रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या युवक आघाडीने येथील बिंदू चौकामध्ये या घटनेच्या निषेधार्थ निदर्शने केली. हल्लेखोरांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करीत यावेळी निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. आंदोलनामध्ये आघाडीचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे, गुणवंत नागटिळक, राहुल कांबळे, किरण निकाळजे यांच्यासह सुमारे ४० कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी लक्ष्मीपुरी आणि राजवाडा पोलीस ठाण्यात याबाबत निवेदन देऊन हल्लेखोरांवर कारवाईची मागणी करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.