दूध दरवाढ करण्याच्या मागणीसाठी भाजपाने केलेल्या आंदोलनावर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. आजचे आंदोलन हे भाजपाच्या अस्तित्वासाठी केलेला स्टंट आहे, अशी टीका सतेज पाटील यांनी केली.

दूध दरवाढ करण्याच्या मागणीसाठी राज्यात आज भाजपा, रयत क्रांती संघटना, रासप, रिपाई पक्षांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दरम्यान, याला कोल्हापुरात सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर दिले तसेच गोकुळ दुध संघ आणि त्यांच्या नेत्यांवर निशाणा साधला. आजच्या आंदोलनात गोकुळचे नेते धनंजय महाडिक सहभागी झाले होते. हा संदर्भ घेऊन पाटील म्हणाले, “या नेत्यांनी हिंमत असेल तर दूध विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून शेतकऱ्यांना पाच रुपये प्रतिलिटर दर वाढवून द्यावेत. याची सुरुवात गोकुळ दूध संघातून करावी.” तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातून आंदोलन केले, त्यावरून चंद्रकांत पाटील हे पुण्याचे आमदार असल्याने ते पुण्यात आंदोलन करतात, असा टोलाही सतेज पाटील यांनी यावेळी लगावला.