नगरसेविका सुरेखा प्रेमचंद शहा यांच्या घरात श्रीलंका-दक्षिण आफ्रिका सामन्यावर सुरू असलेल्या सट्टेबाजीवर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकला. सोमवारी रात्री उशिरा केलेल्या या कारवाईमध्ये पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी १० ते १५ मोबाइल, तीन लॅपटॉप जप्त केले.
‘टी२० वर्ल्ड कप’ सुरू असून मालिकेतील सामन्यांवर कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार बेटिंग सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी बेटिंग प्रकरणाची पाळेमुळे खणून काढून बेटिंग चालकांना हद्दपार करण्याचे आदेश दिले होते.
विश्वचषक ‘टी२०’ स्पध्रेतील ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान सामन्यावर सम्राटनगर येथे सुरू असलेल्या बेटिंग रॅकेटचा स्थानिक गुन्हे अन्वेषणने पर्दाफाश केला होता. या प्रकरणी स्थायी सभापती मुरलीधर जाधव, नगरसेवक ईश्वर परमार यांचे बंधू संतोष परमार यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली होती.
सोमवारी रात्री रुईकर कॉलनी येथील एका अपार्टमेंटमध्ये नगरसेविका सुरेखा शहा यांच्या घरात श्रीलंका-साऊथ आफ्रिका यांच्यातील सामन्यावर बेटिंग सुरू असल्याची माहिती शाहुपरी पोलिसांना मिळाली होती. यानुसार रात्री १० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता चौघे जण क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेत असल्याचे आढळून आले. यानुसार पोलिसांनी चौघांना अटक केली असून स्वप्निल तहसीलदार पसार झाला आहे.