वंदे मातरम्, राष्ट्रगीत, योग, गीतापठण, सूर्यनमस्कार याद्वारे हिंदू संस्कृती बहुजनावर लादण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे धर्मनिरपेक्षता धोक्यात आली असून, या सक्तीच्या प्रकारास आमचा विरोध राहील, असे मत भारतीय मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मौलाना सलीलूल रहेमानी सय्यद नवमानी यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
इंडियन मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड, भारत मुक्ती मोर्चा, विश्व िलगायत महासभा, संत शिरोमणी अकाली दल, बुद्धिस्ट इंटरनॅशनल सेंटर, इंडियन कॅथॉलिक बिशप असोसिएशन आदी धार्मिक संघटनांच्या वतीने रविवारी येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसंवादाचे उद्घाटन श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज यांच्या हस्ते होणार असून, यास दीड लाख लोक उपस्थित राहणार असल्याचे संयोजकांचे म्हणणे आहे. या पाश्र्वभूमीवर करवीरनगरीत आलेले मौलाना नवमानी यांनी आपली भूमिका मांडली.
ते म्हणाले, धर्म ही वैयक्तिक बाब आहे. त्याबाबत कसलीही सक्ती करता येणार नाही. देशातील राज्यकत्रे वरील बाबी सक्तीने बहुजन समाजावर लादत आहेत. वेळ पडल्यास धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावर न्यायालयीन लढा देणार आहोत. तसेच रस्त्यावर उतरूनही आम्हाला भूमिका मांडावी लागेल.
इसिस ही दहशतवादी संघटना भारतात हातपाय पसरत असल्याच्या मुद्यात तथ्य नाही, असा उल्लेख करून नवमानी म्हणाले, भारतात इसिसला मुळीच थारा मिळणार नाही. इसिस आणि देशातील मुस्लीम यांचे कदापिही संबंध येणार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले.
पठाणकोट येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा आपण तीव्र शब्दांत निषेध नोंदवतो, असा उल्लेख करून ते म्हणाले, देशाची सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याबाबत मुस्लिमांमध्येही दुमत असल्याचे कारण नाही. आतंकवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व शक्तीने एकत्र आले पाहिजे. या हल्ल्याचा निषेध मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डही करीत असल्याचे त्यांनी सांगितले.