‘संध्याछाया भिववती..’ अशा अवस्थेत आला दिवस कंठणाऱ्या इचलकरंजी येथील समाधान वृद्धाश्रमातील आजी-आजोबांची मने रिझवत युगंधरा संस्थेच्या युवतींनी ‘व्हॅलेन्टाइन डे’ अनोख्या पद्धतीने साजरा केला. या प्रेमभावाने तृप्त झालेल्या आजी-आजोबांनी अश्रूंना वाट मोकळी करत मनोवस्था व्यक्त केली.

१४ फेब्रुवारी हा प्रेमिकांच्या दिवस. याला सामाजिक आयामची जोड दिली ती युगंधरा संस्थेतील  युवतींनी. त्यांनी अनोख्या पद्धतीने व्हॅलेन्टाइन डे साजरा केला. इचलकरंजी येथील िलबू चौक येथील समाधान वृद्धाश्रमामध्ये जाऊन त्यांनी हा दिवस साजरा केला. आजी-आजोबा हे जगातील पहिले विकिपीडिया असल्याचे सांगत युवतींनी घडवून आणलेला कृतज्ञता सोहळा आजी-आजोबांना मनोभावे आवडला. नातवंडे आणि आजी-आजोबा यांचे नाते दृढ करण्यासाठी हा उपक्रम राबवला असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी या युवतींनी आपल्या आजी-आजोबांच्या आठवणींना उजाळा देत आजी- आजोबांबद्दल प्रेमभाव व्यक्त केला. आजी,  आजोबा,  नातवंडं तसेच कुटुंब पद्धती यातील विविध गोष्टींचा ऊहापोह केला गेला.  गीता माळींच्या सुरेल गाण्यांवर आजी-आजोबांनी नातवंडांसमवेत चांगलाच ठेका धरला. मग आजी-आजोबांसमवेत फुगडय़ा खेळून आनंद लुटला. आजी-आजोबांनी वार्धक्याने खचून न जाता आनंदाने आयुष्य जगावे अशी अपेक्षा युगंधराच्या लाडक्या नातवंडांनी केली.  युवतींनी कोरडे प्रेम न दाखवता आजी-आजोबांना आवश्यक असणाऱ्या वस्तू देत दिलासाही दिला.

आजी-आजोबांपासून ते नातवंडांपर्यंत असलेले उबदार नाते तीन पिढय़ांच्या घट्ट बंधनात खरे घरे टिकून असत. मात्र, आजी-आजोबा व नातवंडे यांच्यातील अनामिक प्रेमाला उजाळा देण्यासाठी ‘व्हॅलेन्टाइन डे’ या प्रेम अधोरेखित करणाऱ्या दिवशी हा मनोहारी सोहळा वेगळा आयाम देऊन गेला. या विद्यार्थिनींच्या अनोख्या उपक्रमामुळे तेथील आजी-आजोबांचे डोळे पाणावले. युगंधरा संस्थेच्या ज्योती माने, ज्योती जाधव, प्राजक्ता नवनाळे, निकिता सूर्यवंशी, सोनाली िशत्रे, सोनाली कोळी, अंकिता कांबळे, राजश्री माने, सुषमा िशत्रे यांच्यासह समाधान वृद्धाश्रमच्या अध्यक्षा सुवर्णा चौगुले, साधना साळुंखे उपस्थित होत्या.