शहरातील निम्म्या भागात सोमवारी पाणीपुरवठा होऊ शकला नाही. तर इचलकरंजीतील अवधूत आखाडा परिसरात अळीमिश्रित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. कोल्हापुरातील आयटीआय वसतिगृह भागातील गळती काढण्याचे काम गतीने सुरू असल्याची माहिती जल अभियंता मनीष पवार यांनी दिली .
कोल्हापुरातील आयटीआय वसतिगृह भागातील भागातील जलवाहिनीमध्ये गळती सुरू झाली आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचा पाणीपुरवठय़ावर विपरीत परिणाम झाला आहे. विशेषत:  शिवाजी पेठ, देवकर पाणंद, जवाहरनगर, राजेंद्रनगर, पाण्याचा खजिना आदी भागांत त्याचा परिणाम जाणवला. पाण्याअभावी नागरिकांना भलतीच पायपीट करावी लागली, तर प्रशासनाने गळती काढण्यासाठी कंबर कसली. दुरुस्तीचे काम जलदगतीने सुरू असल्याची माहिती जल अभियंता मनीष पवार यांनी दिली.
इचलकरंजीतील शहराला पंचगंगा आणि कृष्णा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून दूषित आणि दरुगधीयुक्त पाणी आल्याने पालिकेने पंचगंगा नदीतून पाणीउपसा बंद केला आहे. तरीही अवधूत आखाडा परिसरातील नळांना अळय़ामिश्रित पाणीपुरवठा होत आहे. ही माहिती समजताच सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिक दूषित पाणी गाळण्यासाठी कापडाचा वापर करूनही काही ठिकाणी पाण्यात अळय़ा आहेत. नागरिकांतून संताप व्यक्त होत असून, शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे.