कोल्हापूर : सीमालढ्याचे प्रमुख केंद्र असलेल्या बेळगावात कन्नड भाषकांची अरेरावी पुन्हा दिसून आली. महाराष्ट्र मध्यवर्ती एकीकरण समितीचे बेळगाव शहर अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर त्यांनी शाई फेकली. या प्रकारामुळे सीमाभागात संताप व्यक्त केला जात असून या घटनेच्या निषेधार्थ मराठी भाषकांच्या वतीने उद्या मंगळवारी बेळगाव बंदचे आयोजन करण्यात आले आहे.

   कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथे आजपासून सुरूआहे. त्याला विरोध म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याचे आयोजन केले होते. या ठिकाणी कन्नड वेदिका रक्षण समितीचे काही कार्यकर्ते आले. त्यांनी एकीकरण समितीचे शहराध्यक्ष दीपक दळवी यांना चर्चा करायचे असल्याचे सांगून बाजूला नेले. तेथे त्यांच्यावर शाई फेकून ते पळून गेले.

  एकीकरण समितीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी दळवी यांचाच नव्हे, तर समस्त मराठी भाषकांचा अपमान असल्याचे सांगितले. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी बेळगाव बंदचे आयोजन करण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली.

महाराष्ट्राच्या भूमिकेवर टीकास्त्र

  गेली ६४ वर्षे बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषक शांततेच्या मार्गाने महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी लढा देत आहेत. तरीही सीमाभागातील नेत्यांवर अशाप्रकारे हल्ला करणे दुर्दैवी आहे. आता तरी महाराष्ट्राने आणि महाराष्ट्र शासनाने प्रखरपणे आवाज उठवला पाहिजे अन्यथा त्यांना सीमाभागाविषयी काहीच देणे घेणे उरले नाही असे समजून आम्ही आमच्या मार्गाला लागू, असा निर्वाणीचा इशाराही शेळके यांनी दिला.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव शहराध्यक्ष दीपक दळवी यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली.