दस-याच्या खरेदीचे सोने लुटण्यासाठी सज्ज झालेल्या ग्राहकांना रोख रक्कम पुरविताना बँकांना कसरत करावी लागत आहे. ग्राहकांकडून रोकडची मागणी वाढली असताना त्या प्रमाणात रक्कम नसल्याने ती करन्सी चेस्ट (कस्टडी) कडून मिळवण्याचा प्रयत्न करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. दस-याला जोडून सलग सुटय़ा पडणार असल्याने बँकांना ग्राहकांबरोबरच एटीएम फुल्ल करण्यासाठीही धावपळ करावी लागत आहे. रोकड मागणीच्या प्रमाणात बँकांना २५ ते ३० टक्के रोकड कमी पडत असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगितले जात आहे.
‘दसरा सण मोठा, नाही आनंदात तोटा’ असे म्हणत ग्राहक राजा खरेदीचे सोने लुटण्यासाठी बाजारात येतो. विजयादशमीच्या मुहूर्तावर केलेली खरेदी फलदायी असल्याची ग्राहकांची श्रद्धा असते. यामुळे गृहोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक साहित्य, सोने-चांदी, हिरे, कपडे, वाहन, घर, संगणक, मोबाइल अशा विविध प्रकारच्या खरेदीला उधाण येते. ग्राहकांमध्ये अद्याप क्रेडिट-डेबिट कार्डचे प्रमाण फारसे वाढलेले नाही. साहजिकच ग्राहकांकडून रोख रकमेची मागणी या काळात वाढते. नेहमीच्या आíथक व्यवहारापेक्षा दसरा-दिवाळीच्या काळात रोख रकमेत दुप्पट-तिप्पट प्रमाणात मागणी वाढते, असे बँक व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. त्यामुळे रोकड रकमेचा अपुरी उपलब्धता असल्याने बँकांना कसरत करावी लागत आहे.
रोकड कमी पडू लागली की बँकांना आधार असतो तो करन्सी चेस्टचा (कस्टडी). करन्सी चेस्ट म्हणून नियुक्त केल्या गेलेल्या बँकांमध्ये रोकड रक्कम विपुल प्रमाणात असते. कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या निवडक बँकांना करन्सी चेस्टचा दर्जा दिला जातो. कोल्हापुरात स्टेट बँक ऑफ इंडिया (दसरा चौक), बँक ऑफ महाराष्ट्र (ताराबाई पार्क), रत्नाकर बँक (बावडा), स्टेट बँक ऑफ इंडिया (इचलकरंजी) यांना करन्सी चेस्टचा दर्जा आहे. तेथून अन्य बँका रोकड मागवतात आणि मागवलेल्या रोकड इतक्या रकमेचा आरटीजीएस रिझव्‍‌र्ह बँकेला केला जातो. मात्र, रोकड मागणीच्या प्रमाणात रक्कम उपलब्ध होत नसल्याचे बँक व्यवस्थापकांचे म्हणणे आहे.
एटीएम फुल्ल
 तीन दिवसांची सुटी असल्याने बँकांचे व्यवहार बंद राहणार आहेत. यामुळे ग्राहकांना रोख रक्कम मिळविण्यासाठी एटीएमचा आधार घ्यावा लागणार आहे. सुटीच्या काळात एटीएमवर ग्राहकांची झुंबड उडणार हे लक्षात घेऊन बँकांनी एटीएममध्ये पुरेशी रोकड ठेवली आहे. काही बँकांनी एटीएममध्ये जादा ड्रॉवरची सोय करीत आणखी रोकड ठेवून ग्राहकांना अडचणी येणार नाहीत याची दक्षता घेतली आहे. एटीएममधून प्रत्येक ग्राहकाने किती रक्कम काढली याची माहिती डेटा सेंटरला उपलब्ध होत असल्याने रोख रक्कम संपत आली की नव्याने रोकड ठेवण्याची दक्षता बँकांनी घेतली आहे. ग्राहकांना अधिक पसे लागणार याचा अंदाज घेऊन बँकांनी १ हजाराच्या नोटा एटीएममध्ये ठेवल्या आहेत. एका एटीएममध्ये दहा ते पंधरा लाख रुपये रोकड ठेवण्याची सोय असते. पण ज्या शाखांमध्ये ग्राहकांची वर्दळ अधिक असते ही क्षमता चाळीस लाखांपर्यंत वाढवली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सुटीचा संभ्रम
बँकांना दसरा (गुरुवार), शनिवार (चौथा) व रविवार अशा तीन सुटय़ा असताना माध्यमे व समाजमाध्यमांमध्ये शुक्रवार (मोहरम) अशी सलग चार दिवसांची सुटी असल्याचा गरसमज निर्माण केला जात आहे. मोहरमची सुटी रविवारच्या सुटीमध्ये गृहीत धरली आहे. तथापि, दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकामध्ये मराठी भाषेचा वापर एकसारखा होतो. कर्नाटकात दस-याची सुटी गुरुवार व शुक्रवार अशी असल्याने तेथे चार दिवस सुटी आहे. तसा तिकडे बनवला गेलेला मेसेज दक्षिण महाराष्ट्रात फिरत राहिल्याने ग्राहकांमध्ये गरसमज निर्माण झाला असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Banks busy in providing cash
First published on: 22-10-2015 at 03:30 IST