राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये धोका दिल्याचा आरोप करीत आमदार भाई जगताप यांनी या पक्षाशी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी न करता काँग्रेस स्वबळावर लढेल, अशी घोषणा पत्रकार परिषदेत केली. केंद्र व राज्यातील भाजपच्या सरकारकडून सुडाचे राजकारण सुरू असल्याने असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाल्याची टीकाही त्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी कामगारांच्या धोरणाबाबत दाखविलेली स्वप्ने प्रत्यक्षात साकार झालेली नाहीत, अशीही टीका त्यांनी केली. आ. जगताप म्हणाले, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर मी बोलणे उचित नाही; परंतु असे असले तरी राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, हे कोणी नाकारू शकत नाही. त्यांच्याकडून पक्षवाढीसाठी प्रयत्न होत आहेत. काँग्रेसमध्ये लोकशाही आहे. त्यामुळे रिमोट कंट्रोलसारखा पटकन कुठलाही निर्णय घाईगडबडीत घेतला जात नाही. पक्षाची एक निर्णय प्रक्रिया असून, त्यामधूनच सर्वसमावेशक व सर्व विचारांती निर्णय होतात.
आमदार जगताप म्हणाले, मुंबईत विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने आपल्याला धोका दिला. असे असले तरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र आपल्याला मदत केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेहमीच विश्वासघाताचे राजकारण करण्यात आले आहे. त्यामुळे तळागाळातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असून राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर इथून पुढील निवडणुकांमध्ये युती करू नये, असा सूर उमटत आहे. येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीसोबत युती न करता काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवील.