शरद पवार यांना चंद्रकांत पाटील हे कसे आहेत ते कळलेच नाही. चेहऱ्यावर भाव न आणता पाटील फटका लगावतात अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. गेली काही वर्षे शरद पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात वाकयुद्ध सुरू आहे. पाटील यांनी टीकात्मक बोलण्याऐवजी सार्वत्रिक निवडणुकीत निवडून येऊन दाखवावे, असा चिमटा पवार हे सातत्याने पाटील यांना काढत असतात. आता चंद्रकांत पाटील यांनी जणू हे आव्हान स्वीकारत पवार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कोथरूड येथून निवडणूक लढवत आहेत.

“चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमध्ये अडकवून ठेवल्याचं शरद पवार सांगत आहे. पण त्यांना पाटील कळलेलेच नाहीत. पाटील चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता कसा फटका लगावतो हे समजतही नाही,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांनी यावरुन पाटील यांना लक्ष्य करत चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमध्येच अडकवून ठेवले आहे, त्यांना इतरत्र जाता येत नाही असे विधान करीत विरोधकांनी पाटील यांची कोंडी केली असल्याचे म्हटले होते. शरद पवार यांच्या विधानाचा समाचार आज पाटील यांनी कोल्हापुरात उपरोक्त विधान करत घेतला. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना पाटील यांनी ‘पवार तुम्हाला पाटील कळलेच नाहीत, असा टोलाही लगावला.

कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात मनसेचे किशोर शिंदे हे रिंगणात उतरले असून काँग्रेस-राष्ट्रवादीने आपला उमेदवार उभा न करता मनसेच्या शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्याआधारे पाटील विरोधात सर्वपक्षीय असा रंग दिला जात आहे. त्यावरूनही चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर शरसंधान केले. विधानसभा निवडणुकीत आघाडी करताना मनसेला त्यामध्ये घेतले नाही. आणि आता मात्र मनसेच्या उमेदवाराला कोथरुडमध्ये माझ्याविरोधात पाठिंबा देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

‘आयत्या कोथरूडात कोल्हापूरचा चांदोबा’; चंद्रकांत पाटलांना पुणेरी चिमटे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कोथरूडमधून उमेदवारी मिळाल्यानंतर समाजमाध्यमांतून टीकेचा सूर कायम आहे. ‘चंद्रकांत पाटील यांचा कोथरूडमध्ये मागच्या दाराने प्रवेश’, ‘कोथरूडपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ जवळच आहे’, ‘आयत्या कोथरुडात कोल्हापूरचा चांदोबा’ असे खास पुणेरी चिमटे समाजमाध्यमांतून काढले जात आहेत.