शेतकऱ्यांच्या प्रश्नांमुळे चंद्रकांत पाटील संतापले

शेतकऱ्यांशी संवाद साधणाऱ्या भाजपच्या शाहूवाडी तालुक्यातील शिवार संवाद यात्रेदरम्यान शेतकऱ्यांनी प्रश्न विचारण्यावरून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकत्रे यांच्यात विसंवाद निर्माण झाला. ‘मी विचारणा करेन त्या शेतकऱ्याने प्रश्न विचारावेत.’ अशी भूमिका मंत्री पाटील यांनी घेतल्यावर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा मारा सुरू केल्याने मंत्री संतापले. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

साळशी (ता. शाहूवाडी) येथील एका शेतात ‘शिवार संवाद यात्रे ‘चे आयोजन केले होते. मंत्री पाटील यांनी उपक्रमाची माहिती दिली. त्यानंतर संवाद सुरू व्हावा यासाठी पहिला प्रश्न विचारला तो मेंढपाळ होता. त्याने जनावरांना चरण्यासाठी कुरणाची सोय नसल्याची अडचण मांडली. त्यावर पाटील यांनी मेंढीपालन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर त्यांनी आणखी एका शेतकऱ्याला प्रश्न विचारण्यास सांगितले, पण त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

ही संधी साधत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शाहूवाडी शहर अध्यक्ष सुरेश म्हाउटकर यांनी मंत्र्यांना थेट अडचणीत आणणारे प्रश्न विचारले. परंतु पाटील यांनी ‘मी विचारणा करेन त्यानेच प्रश्न विचारावा.’ असा पवित्रा घेतला. त्यास आक्षेप घेत म्हाउटकर यांनी मागेल त्याला शेततळे,  ठिबक सिंचन योजना यांसह लोकसभा निवडणूक काळात नरेंद्र मोदी यांनी शेतमालासाठी  स्वामिनाथन आयोग लागू करण्याची घोषणा केली होती, त्याबाबत अद्याप काहीही का निर्णय झाला नाही, असा प्रश्न केला.

मंत्री पाटील हे तसे शांत स्वभावाचे पण हा प्रश्न न रुचल्याने त्यांचा पारा चढला. पाठोपाठ संघटनेचे शाहूवाडी तालुका उपाध्यक्ष अमर पाटील यांनी शेतीसाठी २४ तास वीज देण्याच्या घोषणेचे काय झाले, अशी विचारणा केल्याने ते आणखी चिडले.

यातून वाद घडू नये यासाठी पोलीस लगेचच पुढे सरसावले. त्यांनी स्वाभिमानीच्या दोन्ही  कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तरीही या दोघांसह अजित साळुंखे या कार्यकर्त्यांने शेतकरी प्रश्नाबाबतच्या घोषणा देणे सुरूच ठेवल्याने शिवार संवाद यात्रेदरम्यान विसंवाद निर्माण झाला. पोलिसांनी त्या दोघांना बांबवडे पोलीस चौकीत आणले. त्यांचा जबाब घेऊन नंतर सोडण्यात आले.

यानंतर  सुरेश म्हाउटकर यांनी आत्मक्लेश यात्रेत सहभागी झालेले स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून वृत्तांत कथन केला. शेट्टी यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याशी याबाबत चर्चा केली.