कोल्हापूर : महाराष्ट्र केसरी किताबचा मान कोल्हापूरला मिळवून दिल्याबद्दल पृथ्वीराज पाटील यांचा व इतर वजन गटातील लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल १८ कुस्तीगिरांचा नागरी सत्कार येथे पार पाडला. कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात श्रीमंत शाहू महाराज, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मल्लांचा सत्कार केला. या वेळी त्यांनी ‘महाराष्ट्र केसरी किताब कोल्हापूरला दोन दशकांनंतर मिळाला.

शाहू महाराजांच्या भूमीचा पृथ्वीराजने अभिमान वाढविला आहे. इतर वजन गटात देदीप्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल त्याचे अभिनंदन करतो, अशा शुभेच्छा दिल्या. पाटील यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुढील वर्षी कोल्हापूर येथे आयोजित करण्याचे आश्वासन देतानाच शासनामार्फत मल्लांना बक्षीस, खुराक व अत्याधुनिक सुविधा यासाठी निधीची कमतरता होणार नाही, असे सांगितले.

मदतीचा वर्षांव

पृथ्वीराज पाटील याने ऑलिपिंकचे स्वप्न अजूनही अधुरे असून यासाठी सर्वाची मदत, पाठबळ मिळाल्यास निश्चित यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. श्रीमंत शाहू महाराज यांनी पृथ्वीराजला बक्षीस म्हणून १ लाख रुपयांचा धनादेश प्रदान केला. खासदार संजय मंडलिक यांनी मल्लांच्या अत्याधुनिक वसतिगृहासाठी सदाशिवराव मंडलिक ट्रस्टच्या वतीने ३० लाख रुपयांची घोषणा करून दीड लाखाचा धनादेश सुपूर्द केला.

या मल्लांचा सत्कार

सुशांत तांबुळकर, सोनबा गोंगाणे, सौरभ पाटील, किरण पाटील, भगतसिंह खोत, स्वप्निल पाटील, अतुला चेचर, अनिल चव्हाण, बाजीराव पाटील, ऋषिकेश पाटील, ओंकार लाड, संग्राम पाटील, बाबासाहेब रानगे, प्रवीण पाटील, नीलेश हिरूगडे, अक्षय ढेरे, अमोल बोंगार्डे यांचा सत्कार करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा व राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी स्वागत, सरचिटणीस अ‍ॅड. महादेवराव आडगळे यांनी प्रास्ताविक तर आभार हिंदूकेसरी विजेते दीनानाथसिंह यांनी मानले.