कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे खून खटला प्रकरणातील साक्षीदारांची तपासणी ६ मार्चपासून सुरू होणार आहे. चार साक्षीदारांची नावे विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि शिवाजीराव राणे यांनी मंगळवारी न्यायालयात दिली.
कॉम्रेड गोविंद पानसरे खून खटल्याचे कामकाज येथील न्यायालयामध्ये सुरू आहे. गेल्यावेळी साक्षीदारांची नावे न्यायालयाकडे दिली होती. आता ६ तारखेपासून साक्षीदार तपासणी सुरू होणार आहे. त्यामध्ये पानसरे यांच्या मृतदेहाचा पंचनामा केलेले मुंबईतील दोघे पंच तसेच पानसरे यांचे कपडे, अंगावरील वस्तू जप्त केलेले दोन पंच अशा चौघांची तपासणी होणार आहे. ही नावे बचाव पक्षालाही देण्यात आली आहेत. आज त्यांना साक्षी समज काढण्याबाबत न्यायालयात विनंती केली. न्यायालयाने ती मान्य केली. न्यायालयात अॅड. शिवाजीराव राणे, अॅड. विवेक पाटील, अॅड. चेतन शिंदे, कॉम्रेड दिलीप पोवार आणि एटीएसचे अधिकारी हजर होते.